आपला जिल्हा

बैलपोळ्याच्या तयारीत इंदापूरची बाजारपेठ सजली 

वस्तूंच्या दरात 20 ते 30 टक्क्यांची वाढ

बैलपोळ्याच्या तयारीत इंदापूरची बाजारपेठ सजली 

वस्तूंच्या दरात 20 ते 30 टक्क्यांची वाढ

इंदापूर,आदित्य बोराटे –

उद्या रविवारी (दि. 21 सप्टेंबर) जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या भाद्रपदी बैलपोळा सणानिमित्त इंदापूर येथे बैलपोळ्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठ रंगबिरंगी साहित्यांनी सजली आहे.

दरवर्षी, पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या बैलपोळा सणासाठी बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू मोठ्या प्रमाणात शेतकरी खरेदी करीत आहेत. बाजारात बैलांच्या शिंगांना बेगड्या, अंग झाकण्यासाठी रंगबिरंगी झालर, झुल, कंड, गोंड, मोहरकी, घुंगरांची चाळ, रंगबिरंगी दावे, घुंगराची माळ, चमकी डाळ, दृष्ट माळ, गळ्यातील घंटी माळ, नंदी काळी मोरकी, नंदी रंगीत मोरकी, नंदी पट्टा, लाल पट्टा कंडा, काळा कंडा, शंख, पितळी साखळी आदी विविध साहित्य विक्रीसाठी ठेवलेले आहे.

शेतकऱ्यांमध्ये उत्साह असून, वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाबद्दल ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणून हा सण साजरा केला जातो. यंदा चांगले पर्जन्यमान असल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला असून, बैलांसाठी वेसण, घुंगर माळा, पैंजण, म्होरकी, घाटी, झुल, गोंडे यांसारख्या वस्तू खरेदीसाठी शेतकरी बाजारात गर्दी करीत आहेत. तसेच, घरगुती पूजनासाठी मातीच्या बैलांसह प्लास्टर ऑफ पॅरिसचे विविध आकार व रंगसंगती असलेले बैल देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

महागाई असूनही दरवर्षीच्या तुलनेत वस्तूंच्या दरात 20 ते 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, पावसाने चांगली बॅटिंग केल्यामुळे शेतातील पिके जोमात आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे, असे व्यापारी सुहास लोखंडे यांनी सांगितले.

आठवडे बाजारात गर्दी

रविवारी इंदापुरात आठवडे बाजारात बैलपोळासाठीच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी आणि गर्दी अपेक्षित आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी बाजारात येतात आणि व्यापाऱ्यांची संख्याही जास्त असते.

Back to top button