शैक्षणिक

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील खेळाडूंचे विविध स्तरावर यश

१५० पेक्षा जास्त खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील खेळाडूंचे विविध स्तरावर यश

१५० पेक्षा जास्त खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत.

बारामती वार्तापत्र 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रथितयश महाविद्यालय म्हणून ओळख असणा-या बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविला आहे.  लेशान, चायना येथे झालेल्या २१ वर्षाखालील आशिया ओशियानिया कॉर्फबॉल स्पर्धेत भारतीय संघाने सहावे स्थान पटकावले. या संघातून खेळणा-या समीर भोसले या खेळाडूला स्पर्धेतील बेस्ट रिबाउंडर या पुरस्काराने गौरविण्यात आले. स्पर्धेत मुलांमध्ये समीर भोसले, अभिषेक माने व हर्ष मोहिते तर मुलींमध्ये किरण भोसले व श्वेता वाघ यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

लेशन, चायना येथेच झालेल्या १९ वर्षाखालील आशिया ओशियानिया कॉर्फबॉल स्पर्धेत भारतीय संघातून खेळताना मुलांमध्ये अथर्व वायाळ, आदित्य करचे व वाहिद मुलांनी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अभिमानाची बाब म्हणजे २१ वर्षाखालील संघाचे नेतृत्व किरण भोसले तर १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व अथर्व वायाळ यांनी केले. दोघेही याच महाविद्यालयाचे खेळाडू आहेत.

दक्षिण कोरिया येथे झालेल्या आशियायी युवा नेटबॉल स्पर्धेत या महाविद्यालयाची नेटबॉल खेळाडू गौरी शेंडे हिने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले तर शरयू जगताप हिची संघव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली.

शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही या महाविद्यालयाने मागील काही वर्षात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या दहा वर्षात या महाविद्यालयाचे २० खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत तर १५० पेक्षा जास्त खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत.

खेळाडूंना उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षण व साहित्य हे महाविद्यालय उपलब्ध करून देते. या महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.गौतम जाधव व अशोक देवकर हे स्वतः खेळाडूंना प्रशिक्षण देतात त्यांना प्रा.सुहास डेरे, ज्योती उदावंत व वरिष्ठ खेळाडू वरुण पोमणे यांचे सहकार्य लाभले.

Back to top button