बारामती पोलिसांचा धाक राहिलाय की नाही?कारच्या काचा फोडून तीन लाखांची रोकड लंपास; सीसीटीव्हीत प्रकार कैद
ही दुसरी घटना असल्याने नागरिकांत चिंतेचं वातावरण

बारामती पोलिसांचा धाक राहिलाय की नाही?कारच्या काचा फोडून तीन लाखांची रोकड लंपास; सीसीटीव्हीत प्रकार कैद
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर उभी असलेल्या कारची काच फोडून त्यातील तब्बल तीन लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि. २२ सप्टेंबर) घडली. या चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांतील ही दुसरी घटना असल्याने नागरिकांत चिंतेचं वातावरण आहे व ठोस उपाययोजना करण्याची मागणी सुरू झाली आहे.
या प्रकरणी संपत सोपान शिंगाडे (रा. काटेवाडी, ता. बारामती) यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी शिंगाडे यांनी बँक ऑफ इंडिया मधून तीन लाख रुपये काढले.
रोकड कारमध्ये ठेवून ते भिगवण रस्त्यावरील एका दुकानात खरेदीसाठी गेले. काही वेळानंतर परत आल्यानंतर त्यांच्या कारची काच फुटलेली दिसली. तपासल्यावर रोकड गायब असल्याचे उघड झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये संशयितांचा मागोवा लागत असून चोरटे परप्रांतीय असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.