बारामतीच्या पेन्सिल चौकात वाहतुकीचा बोजवारा; पोलिसांचा मात्र मोबाईलमध्ये टाईमपास?
कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

बारामतीच्या पेन्सिल चौकात वाहतुकीचा बोजवारा; पोलिसांचा मात्र मोबाईलमध्ये टाईमपास?
कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील पेन्सिल चौक परिसरात सोमवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. शाळा–कॉलेजची वेळ असल्यामुळे वाहनांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमणुकीवर असलेले पोलिस प्रत्यक्ष कारवाई करण्याऐवजी बघ्याच्या भूमिकेत असल्याचे बारामती वार्तापत्रच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
पेन्सिल चौक परिसरातच विद्या प्रतिष्ठानसारखी मोठी शैक्षणिक संस्था असल्यामुळे दररोज सकाळी आणि दुपारी वाहनांची गर्दी वाढते. विद्यार्थी, पालक, शिक्षक यामुळे रस्त्यावर वाहतूक वाढत असून पादचारी देखील अडचणीत येतात. यावेळी वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
स्थानिक नागरिकांच्या मते, पोलिसांची नेमणूक असूनही ते वाहतूक नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. काही जण रस्त्याच्या कडेला थांबून मोबाईलमध्ये गुंतलेले दिसतात, तर काहीजण गप्पा मारण्यात व्यस्त असतात. यामुळे संपूर्ण चौकात गोंधळ उडतो आणि वाहनधारकांना प्रचंड त्रास होतो.
“दररोजचा हा त्रास सहन करण्यापेक्षा प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात. सकाळ–संध्याकाळच्या वेळी पोलिसांनी खरोखर वाहतूक नियमन करायला हवे, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
या वाहतूक कोंडीमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पेन्सिल चौकात शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.