बारामती तालुक्यातील झारगडवाडीत भगरीच्या पिठातून विषबाधा; चार महिलांवर उपचार सुरू
दुकानावर कारवाई करण्यात आली

बारामती तालुक्यातील झारगडवाडीत भगरीच्या पिठातून विषबाधा; चार महिलांवर उपचार सुरू
दुकानावर कारवाई करण्यात आली.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावात भगरीच्या पिठातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या घटनेत चार महिलांना त्रास झाल्याने उपचार सुरू आहेत. त्यामुळे गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नवरात्रोत्सवात उपवासाच्या दिवसांत महिलांकडून मोठ्या प्रमाणात भगरीच्या पिठाच्या भाकऱ्या बनवल्या जातात. झारगडवाडीतही काही कुटुंबांनी किराणा दुकानातून आणलेल्या भगरीच्या पिठापासून भाकऱ्या केल्या. मात्र त्या खाल्ल्यानंतर काही महिलांना अचानक उलटी, मळमळ व अशक्तपणा जाणवू लागला. प्राथमिक उपचारासाठी डोर्लेवाडी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेल्या दोन महिलांची प्रकृती बरी असून, उर्वरित दोन महिलांवर बारामती मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी तातडीने गावात तिन्ही पथकांसह सर्वेक्षण केले.
गावातील संबंधित किराणा दुकानावर कारवाई करण्यात आली असून शिल्लक भगरीचे पीठ सील करण्यात आले आहे. तसेच विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. रात्री उशिरा अन्न व औषध प्रशासन विभागानेही तपासणी करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
आरोग्य विभागाचे आवाहन
पुणे जिल्हा अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त बी. एम. ठाकूर म्हणाले,”भगरीच्या पिठाच्या भाकऱ्या पूर्ण भाजून न खाल्ल्यास त्या अपूर्ण राहतात आणि त्यामुळे पचनाशी संबंधित त्रास उद्भवू शकतो. नागरिकांनी खबरदारी म्हणून अशा भाकऱ्या खाणे टाळावे..