“कुणी रस्ता देता का रस्ता” रस्त्यासाठी नागरिकांची बॅनरबाजी
बॅनरबाजी करत रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला

“कुणी रस्ता देता का रस्ता” रस्त्यासाठी नागरिकांची बॅनरबाजी
बॅनरबाजी करत रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला
इंदापूर,आदित्य बोराटे –
निमगाव केतकी ते महादेव शिव रस्त्याची दुरावस्था झाली असून स्थानिक नागरिकांना ये जा करण्यासाठी दीड किलोमीटर चिखल तुडवावा लागतो. वारंवार मागणी करूनही या रस्त्याचे काम होत नसल्याने येथील नागरिकांनी चक्क गावात बॅनरबाजी करत रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला आहे. सध्या या बॅनरबाजीची चर्चा निमगाव केतकी परिसरात मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे.
या रस्त्याच्या लगत असणारी श्रीपती जाधव वस्ती, भोंगवस्ती, नवामळा, पाटीलवस्ती या ठिकाणी जवळपास चारशे ते पाचशे लोकांना कामानिमित्त ये जा करावी लागते. तसेच या रस्त्यावरून शाळेसाठी जाणारे ४० ते ५० विद्यार्थी आहेत. या सर्व लोकांना या रस्त्याने ये जा करण्यासाठी कसरत करावी लागते काही वेळा चिखलात पडून विद्यार्थ्यांना आपली शाळा बुडवावी लागले आहे. चिखलामुळे मोटरसायकल देखील जात नाही.
वारंवार या रस्त्यासाठी ग्रामपंचायतला पत्रव्यवहार केलेला असून देखील कोणत्याही प्रकारची दखल ग्रामपंचायतीने घेतली नसल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे. शासनाचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी या भागातील नागरिकांनी बॅनरबाजी करत निषेध व्यक्त केला आहे.
••••••••••
थोडा जरी पाऊस झाला तरी या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात चिखल होतो. त्यामुळे ये जा करण्यासाठी स्थानिक नागरिकांना कसरत करावी लागते. वारंवार मागणी करूनही आमच्या रस्त्याचा प्रश्न सुटत नसल्याने आम्ही मंगळवारी ग्रामपंचायत वर चिखलफेक करत आमच्या रस्त्याचा प्रश्न सुटेपर्यंत धरणे आंदोलनास बसणार आहे.
बाळू जाधव,स्थानिक नागरिक
रस्त्याच्या कडेला असलेल्या चाऱ्या दोन वेळा ग्रामपंचायत च्या माध्यमातून खोलीकरण करण्यात आल्या होत्या. परंतु स्थानिक नागरिक त्या बुजवून टाकत असल्याने त्या ठिकाणी पाणी वाहून जात नाही. परिणामी पाणी रस्त्यावर येऊन चिखल होतो. तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर केला होता परंतु काही स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने रस्ताचे काम करता आले नाही.
लक्ष्मीकांत जगताप,ग्रामसेवक निमगाव केतकी