
अजित दादा पुन्हा भडकले;बारामतीत मार्केट कमिटीच्या सचिवाचा काढला बाप??
दीड कोटी रुपयांचे पेट्रोल उधारीवर
बारामती वार्तापत्र
‘मी तुला सांगतोय, मी तुला तुरुंगात टाकेन हा. तुमच्या काय बापाची आहे का मार्केट कमिटी?’, असा सवाल करत अजित पवारांनी बाजार समितीच्या व्यवस्थापकांना आणि इतरांना दम दिला.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभा पार पडली. यावेळी अजित पवारांना एक निवेदन देण्यात आले. या निवेदनातील पेट्रोल पंप उधारीबद्दलचा मुद्दा वाचल्यानंतर अजित पवारांचा पारा चढला.
अजित पवारांना एक निवेदन देण्यात आले होते, ज्यात अनावश्यक कर्मचारी भरती आणि बाजार समितीने दीड कोटी रुपयांचे पेट्रोल उधारीवर दिल्याचा मुद्दा मांडलेला होता. ते वाचल्यानंतर अजित पवारांना राग अनावर झाला आणि त्यांनी सगळ्यांनाच फैलावर घेतले.
तू उधार कशाला देतो?
अजित पवार अधिकाऱ्याला म्हणाले, “बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दोन कोटी रुपये झाली आहे. दोन कोटी झाली?” त्यानंतर संतापलेले अजित पवार म्हणाले, “तू कशाला उधार देतो?”
त्यानंतर अजित पवारांचा पारा चढला. ते म्हणाले, “मी तुला जेलमध्ये टाकेन हा. मी तुला सांगतोय. विश्वासने सांगितलं किंवा कुणी सांगितलं तरी द्यायचं नाही. विश्वास किंवा कुणी चेअरमन असेल… हा काय चाललाय बावळटपणा? दीड कोटी, कुणाला दिलं पेट्रोल, डिझेल?”
ह्या नालायकांनी दीड कोटींचं पेट्रोल…
“आयला येडी आहेत की, काय रे ही. म्हणजे मी वरून पैसे आणायचे आणि ह्या नालायकांनी दीड-दीड कोटींचं पेट्रोल-डिझेल उधारीवर द्यायचं. तुमच्या काय बापाची आहे का मार्केट कमिटी?”, अशा शब्दात अजित पवारांनी सगळ्यांना झापले.
“माझ्याही बापाची नाही आणि तुझ्याही बापाची नाही. माझ्या शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची आणि हमालांची आहे. किती दिवस झाले?”, असे सवाल करत अजित पवारांनी इतरांना विचारलं की, “तुम्ही काय करता रे, हजामती करता का इथे. एक महिना नाही. दोन महिना नाही. मी पण पंप चालवतोय. कुणाची उधारी आहे?”, असे अजित पवार म्हणाले.
कुणाची किती उधारी मला सांगा
“कुणा-कुणाची उधारी आहे, ते दाखव. मागच्या वेळी खरेदी विक्री संघ असाच अडचणीत आला. पुढाऱ्यांची उधारी झाली. एकानेही भरली नाही. सर्वसामान्य माणसांसाठी या संस्था काढल्या आहेत. कुणा-कुणाची किती उधारी आहे, ते मला कळलं पाहिजे. माळेगावच्या कारखान्याच्या एमडीला पण सांगा उधारी द्यायचं नाही”, अशा शब्दात अजित पवारांनी सर्वांना सुनावले.