शैक्षणिक

विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात जनरेटिव्ह एआय विषयावर सागर जांगळे यांचे व्याख्यान

आयटी क्षेत्रात २५ वर्षांहून अधिक अनुभव

विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात जनरेटिव्ह एआय विषयावर सागर जांगळे यांचे व्याख्यान

आयटी क्षेत्रात २५ वर्षांहून अधिक अनुभव

बारामती वार्तापत्र

विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागाच्या वतीने जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Gen AI) या विषयावर मार्गदर्शनपर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या व्याख्यानासाठी एचसीएल टेक्नॉलॉजीज, पुणे येथील वरिष्ठ एंटरप्राइज आर्किटेक्ट श्री. सागर जांगळे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

श्री. जांगळे यांना आयटी क्षेत्रात २५ वर्षांहून अधिक अनुभव असून त्यांनी १० पेक्षा जास्त देशांत कार्य केले आहे.

आपल्या अनुभवाचा आविष्कार करताना त्यांनी जनरेटिव्ह एआयची संकल्पना, त्याची कार्यपद्धती व विविध उद्योगक्षेत्रातील उपयोग स्पष्ट करून विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगारसंधींची दिशा दाखवली.

त्यांनी एआय म्हणजे मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करणारी यंत्रे अशी सोपी व्याख्या सांगत, पारंपरिक एआय व जनरेटिव्ह एआय यामधील फरक विद्यार्थ्यांना उदाहरणांसहित समजावला. चॅटबॉट्स, ChatGPT यांसारख्या साधनांच्या मदतीने शिक्षण, उद्योग व दैनंदिन जीवनातील बदल कसे होत आहेत याची माहिती त्यांनी दिली.

जनरेटिव्ह एआयमुळे आरोग्य, वित्त, शिक्षण, मनोरंजन या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडत असून विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करून सर्जनशीलता व समस्या सोडविण्याच्या कौशल्यात प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून चर्चेला अधिक परिपूर्णता दिली. संगणकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ गजानन जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा गौतम कुदळे यांनी करून दिला तर आभार प्रा किशोर ढाणे यांनी मानले.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भरत शिंदे, डॉ जगदीश सांगवीकर, प्रा क्रांती सपकाळ, रमा रोडे, कल्पना भोसले, सोनाली ढवळे, प्रिया साळुंखे, सरोजा लांडगे, श्रद्धा ननवरे, वैष्णवी चौधरी, तृप्ती कदम, विनय गायकवाड यांनी सहकार्य केले.

Back to top button