संपुर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्तांना व शेतकऱ्यांना तात्काळ भरघोस मदत व संपूर्ण कर्जमाफी करावी बारामती संभाजी ब्रिगेडची मागणी
हेक्टरी किमान १ लाख रुपयांची मदत

संपुर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्तांना व शेतकऱ्यांना तात्काळ भरघोस मदत व संपूर्ण कर्जमाफी करावी बारामती संभाजी ब्रिगेडची मागणी
हेक्टरी किमान १ लाख रुपयांची मदत
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्रात काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे महाभयंकर पूरस्थिती निर्माण झाली असून ग्रामीण भाग, शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. शेतजमिनी खरडून गेल्या, गावोगावे पाण्याखाली गेले, जनावरे व गुरेढोरे मृत्युमुखी पडले, घरदार, संसारोपयोगी साहित्य तसेच मुलांचे शैक्षणिक साहित्य यांचे मोठे नुकसान झाले आहे.
हाताशी आलेले पीक वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांची जगण्याची उमेद संपुष्टात आली असून येणाऱ्या काळात आत्महत्यांचा धोका निर्माण झाला आहे.
या भीषण परिस्थितीत सरकारने कोणतेही निकष न लावता तिजोरी खुली करून पूरग्रस्तांना भरघोस मदत करावी, हेक्टरी किमान १ लाख रुपयांची मदत, गुराढोरांना बाजारभावानुसार नुकसानभरपाई तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, या मागणीचे निवेदन आज बारामती येथे मा.उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना संभाजी ब्रिगेडने पाठवले.
आज संपूर्ण महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी प्रश्नावर आंदोलन छेडले. सरकारने पुढील दोन दिवसांत योग्य ती उपाययोजना केली नाही तर उपमुख्यमंत्री यांच्या बारामती येथील बंगल्यासमोर जागरण गोंधळ घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष विनोद जगताप, बारामती तालुकाध्यक्ष तुषार तुपे, बारामती शहराध्यक्ष सागर भोसले, तालुका सचिव ऋषिकेश निकम, कार्याध्यक्ष जावेद शेख, संघटक आप्पासो लोखंडे, चक्रपाणी जगताप, अशोक निकम, महादेव नलावडे, स्वप्निल कराळे, आदित्य मोतलिंग इत्यादी पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.