स्थानिक

अखेर प्रशासनाने बारामती शहरात अवजड वाहनांना ८ ऑक्टोबर पर्यंत बंदी!

सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत.

अखेर प्रशासनाने बारामती शहरात अवजड वाहनांना ८ ऑक्टोबर पर्यंत बंदी!

सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत.

बारामती वार्तापत्र 

२९ सप्टेंबर रोजी बारामतीतील फलटण चौकात ७५ वर्षे वृद्धाचा हायवा डंपर खाली सापडून मृत्यू झाल्यानंतर बारामतीकर संतप्त झाले आहेत. त्यातच काल पुन्हा ३० सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या वेळी शाळेतील मुलांना घरी सोडण्यासाठी आलेल्या स्कूल बसला हायवा डंपरने धडक देऊन मागे रेटण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये शाळकरी मुले अगदी थोडक्यात बचावली. यानंतर बारामतीकरांचा उद्रेक आणखीनच वाढला. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला आहे.

बारामतीच्या वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी या संदर्भात एक आदेश निर्गमित केला असून, यामध्ये बारामती शहरामध्ये २९ सप्टेंबर पासून खडी, क्रशसॅंड, वाळू, माती, मुरूम वाहणारी चार ब्रास पेक्षा अधिक क्षमतेची अवजड वाहने सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत शहराच्या कोणत्याही परिसरातून नेता येणार नाहीत.

अगदी मोतीबाग चौक ते कसबा, सातव चौक ते पेन्सिल चौक,महात्मा फुले चौक ते खंडोबानगर,इंदापूर चौक ते तीन हत्ती चौक, कोर्ट कॉर्नर ते पेन्सिल चौक तसेच शहरातील कोणत्याही चौकामध्ये व शहरातील कोणत्याही रस्त्यावर अवजड वाहने व डंपर यांना बंदी घालण्यात आली आहे.

तसेच वाहतुकीला परवानगी असल्याच्या काळात देखील ३० किलोमीटर प्रति तासापेक्षा अधिक वेगाने अवजड वाहने चालवता येणार नाहीत असे देखील सूचित केले आहे. आत्ताच्या आदेशानुसार ८ ऑक्टोबर पर्यंत ही परिस्थिती कायम राहणार असल्याचे वाहतूक निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button