तरुणाईने व्यसनापासून दूर राहणे हेच देशसेवेचे पहिले पाऊल~ चंद्रशेखर यादव
विद्या प्रतिष्ठानमध्ये 'नशामुक्त भारत अभियान' संपन्न_

तरुणाईने व्यसनापासून दूर राहणे हेच देशसेवेचे पहिले पाऊल~ चंद्रशेखर यादव
विद्या प्रतिष्ठानमध्ये ‘नशामुक्त भारत अभियान’ संपन्न
बारामती वार्तापत्र
‘व्यसन हे केवळ शरीराला नव्हे, तर मन आणि कुटुंबालाही पोखरणारे विष आहे. त्यापासूनच तरुणाईने दूर राहणे हेच खरे देशसेवेचे पहिले पाऊल आहे. व्यसनामुळे मानसिक आरोग्य बिघडते, हृदयरोग, नैराश्य आणि तणाव वाढतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या व्यसनांच्या आहारी न जाता समाजात जागरूकतेचा दीप प्रज्वलित करावा,’असा संदेश बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियानांतर्गत, जनजागृती कार्यक्रम’ उत्साहात पार पडला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या यादव यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यभर व्यसनमुक्त, निरोगी आणि उद्दिष्टपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा दिली. व्यसनामुळे होणारे सामाजिक, मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम त्यांनी हृदयस्पर्शी उदाहरणांसह स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.भरत शिंदे होते. त्यांनी बोलताना सांगितले की, ‘आनंदी राहण्यासाठी शरीरातील डोपामाईन, सिरेटोनिन, ऑक्सिटोसिन आणि इंडॉर्फिन या ‘हॅपी हार्मोन्स’ना सक्रिय ठेवा, व्यसनाशिवायही जीवनात आनंद मिळवता येतो.’ यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात ‘हॅपी हार्मोन्स’चा सहवास आणि नशेपासून दुरावा ठेवण्याचा सल्ला दिला. उपप्राचार्य प्रा.अंकुश खोत यांनीही शिस्तीचे व संयमाचे महत्त्व अधोरेखित केले. अभियानासाठी २५० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. भिमराव मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर नोडल अधिकारी प्रा. विजय काकडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा.ज्योती जगताप यांनी आभार मानले.
चौकट:
संगतीमुळे व्यसनाधिनता लागते. त्यासाठी स्वतः संगत चांगली ठेवा. पालकांनीही आपली मुले कोणाच्या संगतीत आहेत? याची शहानिशा केली पाहिजे. ड्रग्स घेणे आणि विक्री करणे अशा गुन्ह्यांबाबत कायद्यात कडक शिक्षेची तरतूद आहे.त्यामुळे आपण यात गुंतणार नाही याची काळजी घ्या.
~चंद्रशेखर यादव