बारामतीच्या बाजारपेठेत दिवाळीची उत्साहवर्धक तयारी —विद्युत रोषणाईने व्यापले लक्ष
स्थानीय खरेदीला प्राधान्य द्या व्यापारी संघटनांचे आवाहन

बारामतीच्या बाजारपेठेत दिवाळीची उत्साहवर्धक तयारी —विद्युत रोषणाईने व्यापले लक्ष
स्थानीय खरेदीला प्राधान्य द्या व्यापारी संघटनांचे आवाहन
बारामती वार्तापत्र
दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून, बारामती शहरातील प्रमुख बाजारपेठा सध्या आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाल्या आहेत. शहरातील व्यापारी संघटनांनी एकत्र येत बाजारपेठांचे दिवाळीनिमित्त सुंदरतेने सजवले आहे, ज्यामुळे नागरिकांचे लक्ष या झगमगाटाकडे वेधले जात आहे.
मारवाड पेठ – महावीर पथ व्यापारी असोसिएशनचा उपक्रम
मारवाड पेठेतील महावीर पथ व्यापारी असोसिएशनने केलेली झगमगती विद्युत सजावट लक्षवेधी ठरत आहे.या विद्युत रोषणाईचे उद्घाटन सुभाष सोमानी, नरेंद्र गुजराती आणि किशोर सराफ यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खुट्टाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची विशेष उपस्थिती होती.
स्टेशन रोड – व्यापारी संघटनेचे उद्घाटन पोलीस निरीक्षकांच्या हस्ते
स्टेशन रोड व्यापारी असोसिएशनने देखील बाजारपेठेला विद्युत प्रकाशाने सजवले असून,
त्याच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस निरीक्षक विलास नाळे, चंद्रशेखर यादव आणि सुशील सोमानी हे मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्ष विनोद ओसवाल आणि सदस्य दीपक गाठे यांनी कार्यक्रमाची सूत्रे सांभाळली.
सिनेमा रोड – मुख्याधिकारींच्या उपस्थितीत रोषणाईचा शुभारंभ
सिनेमा रोड व्यापारी असोसिएशननेही आपल्या परिसरात विलोभनीय विद्युत रोषणाई केली आहे.याचे उद्घाटन मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या हस्ते झाले.
त्यांच्यासोबत सचिन सातव, फकरूद्दीन भोरी, नरेंद्र मोदी, शैलेश साळुंखे आणि प्रवीण आहुजा यांची उपस्थिती होती.
खरेदीसाठी नागरिकांची गर्दी, व्यापाऱ्यांकडून सवलतींचा वर्षाव
दिवाळी जवळ येत असल्याने शहरभरात खरेदीची लगबग वाढली आहे.विशेषतः कपडे, मिठाई, दिवाळी फराळ, सजावटीचे साहित्य, आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.स्थानिक व्यापाऱ्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती व ऑफर्स दिल्या असून, नागरिक उत्साहात खरेदी करत आहेत.
स्थानीय खरेदीला प्राधान्य द्या व्यापारी संघटनांचे आवाहन
दरवर्षीप्रमाणे यंदाही कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे.व्यापारी संघटनांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,”ऑनलाइन खरेदी टाळा व स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ द्या.”