
अल्पवयीन मुलीचा विनयभंग;आरोपीस पाच वर्ष सक्त मजुरी
तिचा उजवा हात मागे ओढला.
इंदापूर;प्रतिनिधि
भिगवण (ता. इंदापूर) येथे अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना शाळेच्या प्रवेशद्वारासमोर येऊन ढकलून देत गळ्याला हात लावून विनयभंग केल्याप्रकरणी एकास पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा इंदापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली आहे.
सागर भीमराव शेलार (वय 33, रा. भिगवण, ता. इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. हा प्रकार भिगवण येथे 30 नोव्हेंबर 2016 रोजी घडली होता. याबाबत पीडित बालिकेने भिगवण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
फिर्यादीप्रमाणे दिनांक 30 नोव्हेंबर 2016 रोजी पीडिता शाळेत जात असताना आरोपी सागर शेलार हा पीडितेच्या शाळेच्या प्रवेशद्वारासमोर आला व पीडितेशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. पीडिता घाबरून पुढे जात असताना आरोपीने मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणून तिच्या पाठीमागून येऊन तिचा उजवा हात मागे ओढला.
त्यामुळे पीडितेने घाबरून रडण्यास सुरूवात केली. त्यावेळेस पीडितेच्या गळयाला हात लावून ढकलून देऊन तिला अश्लील बोलून तिच्याकडे घाणेरड्या नजरेने बघू लागला. या वेळी तेथे लोक आल्याने आरोपी तेथून पळून गेला. याप्रमाणे पीडीतेच्या फिर्यादीवरून भिगवण पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास भिगवणचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एन. एम. राठोड यांनी केला. त्यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरूध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
खटल्याची सुनावणी प्रथम बारामती येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व नंतर इंदापूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांच्यासमोर झाली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे इंदापूरचे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी कामकाज पाहिले. त्यांनी केलेला युक्तिवाद व आलेला पुरावा ग्राह्य धरून इंदापूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश-1 यांनी आरोपी सागर शेलार यास सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात सरकार पक्षास पैरवी अधिकारी सहायक फौजदार ए. जे. कवडे तसेच भिगवण पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक निश्चल शितोळे यांनी सहकार्य केले.






