बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आणि भावी नगरसेवकांकडून गिफ्टवाटप; नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा
“गेल्या पाच वर्षांत ठोस काम न करता आता फक्त गिफ्टवाटप करून मतदारांची मनं जिंकायची?”

बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आणि भावी नगरसेवकांकडून गिफ्टवाटप; नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा
“गेल्या पाच वर्षांत ठोस काम न करता आता फक्त गिफ्टवाटप करून मतदारांची मनं जिंकायची?”
बारामती वार्तापत्र
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीतील माजी आणि भावी नगरसेवकांकडून नागरिकांना गिफ्ट वाटप सुरू झाल्याची चर्चा सध्या शहरभर रंगली आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांपर्यंत गोड बोलणी आणि भेटवस्तू पोहोचवण्याचा हा प्रयत्न अनेकांना प्रश्नचिन्ह निर्माण करणारा वाटत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित माजी व संधी मिळाल्यास भावी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील मतदारांपर्यंत सणासुदीच्या निमित्ताने गिफ्ट पॅक पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी घराघरात कार्यकर्त्यांमार्फत वस्तूंचे वाटप केले जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “पाच वर्षे आम्हाला भेटण्यासाठी वेळ नव्हता, पण आता निवडणूक लागली की अचानक भेटवस्तू आणि हसरे चेहरे दिसायला लागले,” अशा प्रतिक्रिया मिळत आहेत.
शहरातील विकासकामांबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. अनेकांनी रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याच्या समस्या, आणि कचरा व्यवस्थापनातील अकार्यक्षमता याबाबत असंतोष व्यक्त केला आहे. “गेल्या पाच वर्षांत ठोस काम न करता आता फक्त गिफ्टवाटप करून मतदारांची मनं जिंकायची?” असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, या कृतीवर सर्व स्तरातून जोरदार टीका केली असून, “गेल्या पाच वर्षांचा अहवाल जनतेसमोर ठेवा, गिफ्ट देऊन जबाबदारी झाकता येणार नाही,”असा टोला लगावला आहे.
बारामतीतील राजकारण नेहमीच रंगतदार राहिले आहे. मात्र यावेळी मतदार सजग झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर गिफ्टवाटप करून मतदारांचा विश्वास मिळवण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरणार की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.






