बारामतीत खळबळ: सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते यांच्यावर पोलिस जीप चढवण्याचा प्रयत्न? तक्रार घेण्यास पोलिस निरीक्षकांचा नकार!
तब्बल चार ते पाच तास थांबविण्यात आले.

बारामतीत खळबळ: सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते यांच्यावर पोलिस जीप चढवण्याचा प्रयत्न? तक्रार घेण्यास पोलिस निरीक्षकांचा नकार!
तब्बल चार ते पाच तास थांबविण्यात आले.
बारामती वार्तापत्र
सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत शहरात खळबळ उडवून दिली आहे. पोलिसांच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठवल्याचा राग मनात धरून पोलिसांनी त्यांच्या अंगावर जीप घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मोहिते यांनी केला आहे. या घटनेनंतर तक्रार देण्यासाठी गेलेल्या मोहिते यांना पोलिस निरीक्षक विलास नाळे यांनी अरेरावीची भाषा वापरत तक्रार घेण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
अनिकेत मोहिते हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असून, विविध गरजूंना मदतीचा हात देत असतात. त्यांनी यापूर्वीही बारामतीतील पोलिसांच्या कारभारावर कठोर टीका केली होती. बुधवारी (दि.२२ ऑक्टोबर) रात्री साडेनऊच्या सुमारास मोहिते हे इंदापूर रोडवर थांबले असताना एक पोलिस जीप त्यांच्या अंगावर धावून आली. थोड्या अंतरावर थांबलेल्या या जीपने पुन्हा वळण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळानंतर ती तेथून निघून गेली.
या घटनेनंतर मोहिते यांनी विविध संघटना व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी हजेरी लावली. पोलिस निरीक्षक विलास नाळे येणार असल्याचे सांगून त्यांना तब्बल चार ते पाच तास थांबविण्यात आले. अखेर नाळे आले, परंतु त्यांनी “इथे गर्दी कशाला केली?” असा प्रश्न विचारत उपस्थितांना अरेरावीची भाषा केली आणि तक्रार स्वीकारण्यास नकार दिला, असा आरोप मोहिते यांनी केला आहे.
या प्रकाराचा निषेध नोंदवत अनिकेत मोहिते यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात लेखी तक्रार दिली आहे. तसेच पोलिस निरीक्षक विलास नाळे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांची तात्काळ बदली व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. “या प्रकरणी आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू,” असे मोहिते यांनी स्पष्ट केले आहे.