बारामती नगरपालिकेत नक्की चाललंय तरी काय –कर्मचारी रजेचा अर्ज न देता गैरहजर!स्ट्रीट लाईट दिवसाही सुरू
नागरिकांची कामे करण्यासाठी गेल्यानंतर अनेकांना रिकामी खुर्ची दिसली

बारामती नगरपालिकेत नक्की चाललंय तरी काय –कर्मचारी रजेचा अर्ज न देता गैरहजर!स्ट्रीट लाईट दिवसाही सुरू
नागरिकांची कामे करण्यासाठी गेल्यानंतर अनेकांना रिकामी खुर्ची दिसली
बारामती वार्तापत्र
राज्यात दिवाळीच्या सुट्टीनंतर आज सरकारी कार्यालये पुन्हा सुरू झाली असली तरी,बारामती नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा कारभार मात्र नेहमीप्रमाणेच गोंधळलेला दिसून आला.दिवाळीच्या सुट्टीनंतरही अनेक अधिकारी व कर्मचारी आपल्या कार्यस्थळी उपस्थित नसल्याचे चित्र दिसून आले आहे.विशेष म्हणजे, या गैरहजेरीसाठी एका अधिकाऱ्याने औपचारिक रजेचा अर्ज सुद्धा दिलेला नाही.
बारामतीत्तीत स्ट्रीटलाईट दिवस सुद्धा चालू असून याबाबत एका पत्रकाराने नगरपालिकेमध्ये विचारणा केली असता याचे मुख्य कामकाज पाहणारे अधिकारी रजेचा अर्ज न देता व कोणताही फोन घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अधिक माहिती घेतली असता रजेचा अर्ज न करता सुट्टीवर असल्याचे स्थानिक पत्रकारांना माहिती मिळाली
दिवाळीच्या काळात सरकारी कार्यालये बंद असल्याने नागरिकांची अनेक कामे रखडली होती.सुट्टीनंतर कामे पुन्हा सुरू होतील, अशी अपेक्षा होती. मात्र,नगरपालिकेत नागरिकांची कामे करण्यासाठी गेल्यानंतर अनेकांना रिकामी खुर्ची दिसली.
अनेक विभागांमध्ये अधिकारी अनुपस्थित असल्याने नागरिकांना परत जावे लागले.तसेच जेवणाच्या सुट्टीत अधिकारी एक तासाची जेवणाची सुट्टी संपल्यानंतर पुन्हा कामावर वेळेवर हजर राहत नाहीत त्यामुळे नागरिकांना ताटकळत रहावे लागते.बारामतीचे मुख्याधिकारी याकडे लक्ष देणार का?
कॅमेरे बसवले, पण पाहणारा कोणी नाही
नगरपालिकेमध्ये सर्व कक्षांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असले तरी त्यावर कोणतेही निरीक्षण होत नाही, अशी तक्रार नागरिकांकडून येत आहे. मुख्याधिकारी कॅमेऱ्यांद्वारे कर्मचाऱ्यावर लक्ष ठेवतात,की ते स्वतः या बाबतीत उदासीन असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.अनेक वेळा फोन करूनही ते उत्तर देत नाहीत,असाही अनुभव पत्रकारांना आला आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या वर्चस्वाखालील नगर परिषद
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामती मतदारसंघाचे आमदार यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या या नगरपरिषदेत अधिकारी हजर नसल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.नागरिक आणि स्थानिक पत्रकार विचारत आहेत की, “उपमुख्यमंत्र्यांच्या प्रभावाखाली असलेल्या बारामतीत असा नगरपालिकेचा ढिसाळपणा कसा चालतो?”
ऑडिटच्या घोषणा फक्त कागदावरच
काही काळापूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, विभागामार्फत नगरपालिकेतील ऑडिट केले जाईल.मात्र, त्या घोषणेचे काहीच प्रत्यक्ष परिणाम दिसून आलेले नाहीत.त्यामुळे ही घोषणा केवळ बोलण्यापुरतीच राहिली आहे,अशी टीका केली जात आहे.
नागरिकांचा सवाल
सध्या बारामतीत विकासकामे मोठ्या प्रमाणावर दिसत असली तरी प्रत्यक्षात नागरिकांना मूलभूत सेवांसाठी नगरपालिकेत धावपळ करावी लागत आहे. नागरिकांचा प्रश्न असा आहे की “फक्त विकास केला जातो,पण जनतेच्या अडचणींकडे पाहणारे अधिकारी आणि कर्मचारी कुठे आहेत?”
बारामती नगरपालिकेत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत शिस्तभंग दिसून येत असून, नागरिकांच्या कामांवर त्याचा थेट परिणाम होत आहे. मुख्याधिकारी आणि वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.






