स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या आठवड्यात जाहीर होणार? अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चांना उधाण
31 जानेवारीपूर्वी निवडणुका घेणे बंधनकारक आहे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या आठवड्यात जाहीर होणार? अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चांना उधाण
31 जानेवारीपूर्वी निवडणुका घेणे बंधनकारक आहे
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच पार पडणार असल्याची शक्यता आहे.
याआधी दिवाळीनंतर निवडणुका जाहीर होतील, अशी चर्चा होती, मात्र आता दिवाळीला काही दिवस उलटून गेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने 31 जानेवारीपूर्वी निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. दरम्यान, विरोधी पक्षांनी मतदार याद्यांतील गोंधळ दुरुस्त करण्याची मागणी करत निवडणूक आयोगाविरोधात उद्या मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी त्यांची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे निवडणुकीच्या तारखांबाबत उत्सुकता वाढली आहे.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 64 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना त्यांनी महत्त्वाचे संकेत दिले. “पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कुठलाही निधी मिळणार नाही,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता बळावली आहे. अजित पवार यांनी पुढे सांगितले की, “जो काही विकास झाला तो आपण एकोप्याने राहिलो म्हणून झाला आहे. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.”
या कार्यक्रमात विकासकामांसाठी निधी मागणाऱ्यांची गर्दी झाल्याचे दिसून आले. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, आता निवडणुकीपूर्वी कोणताही निधी मिळणार नाही. त्यामुळे कोणीही निधी मागणीसाठी येऊ नये. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रशासनिक हालचालींना गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यातच राज्य सरकारने अलीकडेच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे, ज्यामुळे निवडणुका तातडीने लागण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
आपल्या भाषणात अजित पवार म्हणाले, “जेव्हा शरद पवार आमदार होते, तेव्हा बारामतीत रस्त्यांची अवस्था वाईट होती. तेव्हा दीड-दोन तास लागायचे, पण आता वीस मिनिटांत प्रवास होतो. तुम्ही मला साथ देता म्हणून मी प्रकल्प आणतो आणि खर्च करतो. पण पैशाचा विनियोग नीट न झाल्यास मला बोलावे लागते. मला ते आवडत नाही, पण जबाबदारी घ्यावीच लागते.”
पुरंदर विमानतळाच्या विषयावर ते म्हणाले, “पुण्याचे सध्याचे विमानतळ लष्कराच्या ताब्यात असल्याने पुरंदर येथे नवीन विमानतळ उभारणे आवश्यक आहे. आम्हालाही शेतकऱ्यांच्या जमिनींची काळजी आहे. घेतलेल्या जमिनींचा काही भाग शेतकऱ्यांना परत देण्यात येईल, जेणेकरून त्यांच्या पुढील पिढीचे नुकसान होऊ नये. लोकांचा पाठिंबा म्हणजे त्यांचा वापर करून घेणे नव्हे.”
ते पुढे म्हणाले, “शरद पवार साहेब जेव्हा निवडणूक लढले, तेव्हा फक्त 17,000 मतदार होते. आज बारामतीत एक लाख विद्यार्थी शिकत आहेत. रेल्वे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. काही वेळा विकास करताना जमिनींचे प्रश्न निर्माण होतात, पण काही प्रमाणात समजूत आणि ऍडजेस्टमेंट आवश्यक असते.”
अजित पवार यांनी शेवटी थोड्या हलक्या फुलक्या शैलीत म्हटलं, “माझ्या लहानपणी मला वाटायचं की माणसं जशी शिकतील तशी देवदर्शन कमी होतील, पण उलट झालंय. जितके जास्त शिकले तितके जास्त दर्शनाला जायला लागले. काहीजण म्हणतात की, तिथे गेल्यावर पदावरून घसरतो. पण मी 25 वर्षांपासून पिंपरी चिंचवडला जातोय आणि अजूनही त्याच पदावर आहे.”
एकंदरीत अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे राज्यात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता अधिक स्पष्ट झाली आहे आणि राजकीय वातावरणात निवडणूकपूर्व हालचालींना वेग आला आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील 64 व्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी अजित पवार बोलत होते.
पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आता कुठला निधी मिळणार नाही”, असं वक्तव्य अजित पवार यांनी यावेळी आपल्या भाषणात केलं.
तसेच, आठवड्यात निवडणूक जाहीर होतील. जो काही विकास झाला तो आपण एकोप्याने राहिलो म्हणून झाला आहे. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.






