तुमच्या मुलाला फुकट जमीन का लागते? अंबादास दानवेंचा अजित पवारांना सवाल
पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले?

तुमच्या मुलाला फुकट जमीन का लागते? अंबादास दानवेंचा अजित पवारांना सवाल
पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले?
बारामती वार्तापत्र
राज्यात काय चालू आहे, यावर कुणाचेही लक्ष नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देवाभाऊ म्हणावे का मेवाभाऊ म्हणावे? अशाप्रकारची स्थिती आहे.
पुण्यात मुरलीधर मोहोळ जैन समाजाचे होस्टेल घेऊन मेवा खाण्याचा प्रयत्न करतात. तिकडे अजित पवारांचा मुलगा महार वतनाची जमीन घेण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्राची अशापद्धतीने लूटमार करण्याचा प्रकार सुरू आहे. पुण्यात हे सर्वाधिक होताना दिसत आहे, अशी टीका शिवसेनेचे (ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी केली.
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील महार वतनात येणारी ४० एकरची जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने विकत घेतल्याची बातमी झी २४ वृत्तवाहिनीने दिली. त्यानंतर विरोधकांनी या प्रकरणात अजित पवार आणि पार्थ पवारांना लक्ष्य केले. अंबादास दानवे यांनी एक्सवर सविस्तर पोस्ट लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेवाभाऊ म्हणत महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
नेमके प्रकरण काय?
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील महार वतनाची ४० एकर जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने विकत घेतली. बाजारभावानुसार या जमिनीला १८०० कोटी रुपयांचा दर असण्याची शक्यता दानवे यांनी व्यक्त केली. मात्र केवळ ३०० कोटी रुपयांना जमिनीचा व्यवहार करण्यात आला. तसेच स्टॅम्प ड्युटीही चुकवण्यात आली.

फक्त ५०० रुपये स्टॅम्प ड्युटी
दानवे यांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले, ‘२२ एप्रिल २०२५ रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या ४८ तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे २७ दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या ४० एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये ५००!’
अजित पवारांना विचारला बोचरा सवाल
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यंतरी केलेले विधान चर्चेत होते. शेतकऱ्यांना नेहमी फुकट लागते. साहेबांनी एकदा कर्जमाफी केली होती. आम्ही निवडून येण्यासाठी बोलून गेलो, असे अजित पवार म्हणाले होते. यावरच आता अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले, शेतकऱ्यांना सर्व काही फुकट लागते, असे अजित पवार म्हणाले. मग आता तुमच्या मुलाला जमीन फुकट का लागते? १८०० कोटी रुपयांची जमीन ३०० कोटी रुपयांना का घेतली? मुद्रांक शुल्क का माफ करून घेतले? शेतकऱ्यांच्या लाख-दीड लाखासाठी तुम्ही फुकट लागते म्हणतात आणि दुसरीकडे कोट्यवधींची जमीन घेतात, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.






