राजकीय

पौर्णिमा तावरे यांची इच्छा नसतानाही नगराध्यक्षा; आता जय पवार यांचं नाव चर्चेत

“आता नगराध्यक्षपदासाठी माळेगाव कारखान्याचा पॅटर्न लागू होणार का?”

पौर्णिमा तावरे यांची इच्छा नसतानाही नगराध्यक्षा; आता जय पवार यांचं नाव चर्चेत

“आता नगराध्यक्षपदासाठी माळेगाव कारखान्याचा पॅटर्न लागू होणार का?”

बारामती वार्तापत्र

बारामतीच्या राजकारणात सध्या नवा चर्चेचा विषय रंगतो आहे — पुढचे नगराध्यक्ष कोण? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चेला अधिक जोर आला आहे.

कार्यक्रमादरम्यान अजित पवार म्हणाले “मागील निवडणुकीत मी माझ्या मनातील नगराध्यक्ष कोण आहे हे कुणालाही सांगितले नव्हते. मात्र, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी मोठेपणा दाखवत उद्धव गावडे यांची शिफारस केली होती. त्यानंतर मी नगराध्यक्षा म्हणून पौर्णिमा तावरे यांचे नाव जाहीर केले, तेही त्यांच्या इच्छेविरुद्ध.”

या विधानामुळे बारामतीत “आता नगराध्यक्षपदासाठी माळेगाव कारखान्याचा पॅटर्न लागू होणार का?”असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.

राजकीय चर्चांनुसार, माळेगाव सहकारी साखर कारखान्याप्रमाणे बारामती नगरपालिकेतही गटबाजीचा प्रभाव वाढत चालला आहे.काही नेते स्वमर्जीने निर्णय घेत असल्याने, आता जय पवार यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी पुढे येत आहे.

तथापि,नागरिक आणि कार्यकर्त्यांमधून असे मत व्यक्त झाले की, एक महिला म्हणून पौर्णिमा तावरे यांना पक्षातील काही लोकांकडून गेल्या पाच वर्षांत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तरीदेखील त्यांनी पक्षनिष्ठा आणि प्रामाणिकपणा कायम ठेवला.

तावरे यांच्या कार्यकाळाचा उल्लेखनीय ठसा

पौर्णिमा वैभव तावरे या बारामती नगरपरिषद निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. त्यांच्या विजयाने अजित पवार यांचे विरोधक मोठ्या फरकाने पराभूत झाले होते. त्यांच्या कार्यशैलीचे राज्यभर कौतुक झाले, आणि अजित पवार यांनीही त्यांच्या कामगिरीबद्दल सार्वजनिकरित्या शाबासकी दिली होती.

दरम्यान,पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनीही जय पवार यांच्या नावाला पसंती दिल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

आता सगळ्यांचे लक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे — बारामती नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत कोणाला अंतिम संधी मिळणार?

Back to top button