स्थानिक

अजित पवारांच्या ताब्यातील नामांकित बँकेत मनमानी कारभार ; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष!

कठोर अटी लागू

अजित पवारांच्या ताब्यातील नामांकित बँकेत मनमानी कारभार ; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष!

कठोर अटी लागू

बारामती वार्तापत्र 

बारामती परिसरातील अजित पवार यांच्या ताब्यात असलेल्या प्रसिद्ध सहकारी बँकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मनमानी कारभार सुरू असल्याची गंभीर चर्चा सुरु आहे. या बँकेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः अनेकदा आपल्या भाषणातून गौरवोद्गार काढतात, मात्र आतल्या घडामोडी मात्र वेगळे चित्र दाखवत आहेत.

कर्मचाऱ्यांवर कठोर नियंत्रण

बँकेतील कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,कार्यालयात मोबाईल वापरण्यास बंदी, सुट्टीच्या दिवशी देखील कामासाठी बोलावणे, आणि सीसीटीव्हीद्वारे सतत देखरेख ठेवणे यांसारख्या कठोर अटी लागू करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की, या सर्व गोष्टींमुळे कामाच्या ठिकाणी तणाव आणि अस्वस्थ वातावरण निर्माण झाले आहे.

काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की, “बँकेत काम करणे म्हणजे शिस्त नव्हे तर हुकूमशाही सहन करणे झाले आहे.”

बदली आणि राजकीय हस्तक्षेप

बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमधील बदली प्रक्रिया देखील राजकीय स्वार्थासाठी वापरली जात असल्याचा आरोप आहे. काही कर्मचाऱ्यांना कोणतीही पारदर्शक कारणे न देता एका शाखेतून दुसऱ्या शाखेत हलवले जाते, तर २० वर्षांहून अधिक काळ एकाच शाखेत काम करणाऱ्यांना मात्र बदलले जात नाही.या निर्णयांमागे राजकीय दबाव आणि वैयक्तिक स्वार्थ असल्याचे सूत्रांकडून समजते.

फिंगरप्रिंट, फेस रजिस्टर आणि ग्रुप फोटो अनिवार्य

बँकेत उपस्थिती नोंदविण्यासाठी फिंगरप्रिंट, फेस रजिस्टर आणि दररोजचा ग्रुप फोटो घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना यामागील उद्देश आजवर स्पष्ट करण्यात आलेला नाही. “यामागे काय हेतू आहे, हे कुणालाच समजलेले नाही,” असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

सुट्टींवर निर्बंध

कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारी सुट्ट्यांचा अधिकार असतानाही, त्या बिनविचार कापल्या जातात, असे आरोप पुढे आले आहेत. कोणतीही सुट्टी घेण्यापूर्वी उच्चाधिकार्‍यांची मौखिक परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले असून, त्यात थोडाही फरक पडल्यास पगारातून कपात केली जाते. हे सर्व बँकेचे चेअरमन स्वतःची बँक असल्यागत कर्मचाऱ्यांना हुकूमशाही पद्धतीने वागणूक देत आहेत.

राजीनाम्यांची लाट

या सर्व तणावामुळे अनेक प्रामाणिक आणि जुन्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने राजीनामे दिल्याचे समजते. त्यांच्या जाण्यामुळे बँकेच्या भविष्यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक ग्राहकांशी नाते जोडलेले हे अनुभवी कर्मचारी बँकेच्या प्रगतीसाठी महत्वाची भूमिका निभावत होते.

संघटनेवर राजकीय प्रभाव

बँकेत असलेली कर्मचाऱ्यांची संघटना देखील राजकीय प्रभावाखाली आली आहे,अशी चर्चा बँकेच्या वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आणि हक्काच्या मुद्द्यांवर कोणीही आवाज उठवू शकत नाही.

स्थानिक निवडणुकांवर परिणामाची शक्यता

या सर्व प्रकारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर देखील परिणाम होऊ शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. स्थानिक पातळीवर या प्रकरणाची चर्चा जोरात असून, “अजित पवारांनी फक्त बँकेच्या कामगिरीवर नाही, तर कर्मचाऱ्यांच्या हिताकडेही लक्ष देणे गरजेचे आहे,” अशी मागणी करण्यात येत आहे.

Back to top button