दुष्काळी अशी ओळख असणाऱ्या माढ्याचे चार सुपुत्र एकाचवेळी उपजिल्हाधिकारी! गावाची मान उंचावली, पदोन्नतीमुळे माढा पुन्हा एकदा चर्चेत
दशकांपासून स्पर्धा परीक्षेत मोठ्या प्रमाणावर यश मिळवले आहे.

दुष्काळी अशी ओळख असणाऱ्या माढ्याचे चार सुपुत्र एकाचवेळी उपजिल्हाधिकारी! गावाची मान उंचावली, पदोन्नतीमुळे माढा पुन्हा एकदा चर्चेत
दशकांपासून स्पर्धा परीक्षेत मोठ्या प्रमाणावर यश मिळवले आहे.
बारामती वार्तापत्र
शासनाच्या वतीने नुकतेच तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली असून, माढा तालुक्यातील चार तहसीलदार एकाच वेळी उपजिल्हाधिकारी बनले आहेत.
दुष्काळी अशी ओळख असणाऱ्या माढा तालुक्यातील तरुणांनी गेल्या दोन दशकापासून स्पर्धा परीक्षेत आपले नशीब आजमावले आणि आज तालुक्यातील अनेक तरुण केंद्रीय आणि राज्य स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन मोठमोठ्या अधिकारी पदावर बसलेले आहेत. काल झालेल्या पदोन्नतीमध्ये एकाच तालुक्यातील चार सुपुत्रांना हा पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे.
दुष्काळी आणि शेतीप्रधान असा लौकिक असलेल्या माढा तालुक्यातील तरुणांनी गेल्या दोन दशकांपासून स्पर्धा परीक्षेत मोठ्या प्रमाणावर यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील या तरुणांनी मेहनत, चिकाटी आणि जिद्द यांच्या जोरावर राज्य व केंद्र सेवांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता या चार अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीमुळे माढा तालुक्याने पुन्हा एकदा अभिमानाने मान उंचावली आहे.
माढ्याच्या चार तहसीलदारांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती
वेताळवाडीचे सुपुत्र किरण सुरवसे यांची उपजिल्हाधिकारी पदावर सोलापूर येथे नियुक्ती झाली आहे. सध्या ते हवेली येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. 2004 साली नायब तहसीलदार म्हणून प्रशासनात प्रवेश घेतलेल्या सुरवसे यांनी रायगड, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात उल्लेखनीय सेवा बजावली आहे.
त्यांच्या या पदोन्नतीबद्दल गावकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दारफळ सिना येथील प्रदीप उबाळे यांची नागपूर येथे भूसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. ते याआधी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार म्हणून कार्यरत होते. 2014 साली राज्यसेवेत तहसीलदार म्हणून उत्तीर्ण झालेल्या उबाळेंनी अल्पावधीतच आपल्या कामगिरीने प्रशासनात चांगली छाप सोडली आहे.
पदोन्नतीमुळे माढा तालुका पुन्हा एकदा चर्चेत
निमगाव (टे) चे सुपुत्र गणेश शिंदे सध्या बारामती येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. त्यांची धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे प्रांतधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2007 साली नायब तहसीलदार म्हणून सेवा सुरू केलेल्या शिंदेंनी विदर्भ, सांगली आणि बारामती भागात उत्कृष्ट कार्य केले आहे. तर लऊळ गावाचे सुपुत्र गणेश (बट्टू) गोरे यांची पालघर येथे निवडणूक उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. ते सध्या गगनबावडा येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. 2003 साली नायब तहसीलदार म्हणून रुजू झालेल्या गोरेंनी शिस्तबद्ध आणि संवेदनशील अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. या चौघा अधिकाऱ्यांच्या एकत्रित पदोन्नतीमुळे माढा तालुका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ग्रामस्थ आणि शिक्षक वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






