इंदापूरमध्ये अजित पवार यांच्या गटाला धक्का बसणार?
प्रदीप गारटकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले; सुरेश घुले यांची राजीनाम्याची जोरदार मागणी

इंदापूरमध्ये अजित पवार यांच्या गटाला धक्का बसणार?
प्रदीप गारटकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले; सुरेश घुले यांची राजीनाम्याची जोरदार मागणी
प्रतिनिधी; इंदापूर
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये नवे वादंग उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी “पक्षाने आम्हाला कोलले तर आम्हीही पक्षाला कोलू” असे वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली असून पक्षांतर्गत नाराजीही वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर इंदापूरमधील ज्येष्ठ कार्यकर्ते व स्थानिक नेते सुरेश घुले यांनी प्रदीप गारटकर यांच्या राजीनाम्याची खुली मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जिल्हाध्यक्ष पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे वक्तव्य करणे पक्षशिस्तीला धरून नाही आणि त्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब होत आहे.
घुले यांच्या या मागणीमुळे इंदापूरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषत: आगामी इंदापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक गंभीर ठरू शकतो. नगराध्यक्ष पदासाठी प्रदीप गारटकर कोणत्या पक्षाकडून किंवा गटाकडून अर्ज दाखल करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या घडामोडींमुळे अजित पवार यांच्या गटाला इंदापूरमध्ये खिंडार पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणाचा निकाल लागेल आणि गटांतर्गत संघर्ष उघड होतो का,हे पाहावे लागेल.






