स्थानिक

बारामती नगरपरिषद निवडणूक : स्टॅटीक सर्वेलन्स पथकाचे कक्ष ठरत आहेत ‘शोभेची बाहुली’

“हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे का?”

बारामती नगरपरिषद निवडणूक : स्टॅटीक सर्वेलन्स पथकाचे कक्ष ठरत आहेत ‘शोभेची बाहुली’

“हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे का?”

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपरिषद निवडणुकीत गैरप्रकार रोखण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या स्टॅटीक सर्वेलन्स पथकाच्या (SST) कक्षांची स्थिती अत्यंत गंभीर दिसत आहे.

निवडणूक प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेल्या या कक्षांमध्ये कर्मचारी नसणे, अधिकारी अनुपस्थित असणे आणि पोलिस बंदोबस्ताचा पूर्ण अभाव दिसून येत आहे. त्यामुळे हे कक्ष प्रत्यक्षात ‘शोभेच्या बाहुल्या’सारखे उभे असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

मतदारांना संरक्षण, वाहतूक झालेले निधी व साहित्य तपासणे, संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी SST ची नियुक्ती केली जाते.

मात्र प्रत्यक्ष मैदानात मात्र परिस्थिती उलट दिसत आहे. अनेक कक्षात दिवसभर कोणीही आढळत नाही.. तर काही ठिकाणी रिकामे कक्ष असून कर्मचारीच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे निवडणुकीपूर्वी वाढणारे पैसेवाटप, दारूवाटप, धमकी, बोगस मतदान किंवा अन्य गैरप्रकार होण्याचा धोका अधिक वाढला आहे.

नागरिक आणि मतदार संघटनांनी या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि पोलिस प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून कक्ष कार्यरत करावेत, अशी मागणी केली आहे.

निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी हे कक्ष अत्यावश्यक असताना त्यांची अशी दुर्दशा झाल्याने प्रशासनाच्या तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

बारामती नगरपरिषद निवडणुकीत यंदा प्रशासनाची तयारी अपुरी असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. मागील निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघडकीस आले होते, त्यामुळे यंदा वातावरण आधीच तंग आहे.

परिस्थिती पारदर्शक ठेवण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या पथकाने घेतलेल्या फुटेजच्या सीडी मागितल्या; मात्र त्या ब्लॅंक निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यामुळे “हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे का?” असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे.

दुसरीकडे या सर्व देखरेखीसाठी मोठ्या खर्चाचे टेंडर काढले जात असूनही कक्षे निष्क्रिय, देखरेख शून्य आणि सर्व व्यवस्था बेजबाबदार दिसत असल्याने शासनाचा पैसा वाया जातोय का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Back to top button