बारामती शहराच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर बिबट्याचा धुमाकूळ!व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…
मळद परिसरात बिबट्या फिरत असल्याचे नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

बारामती शहराच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर बिबट्याचा धुमाकूळ!
मळद परिसरात बिबट्या फिरत असल्याचे नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील निरावागज परिसरात गेल्या चार–पाच दिवसांपासून पाळीव प्राण्यांवर सातत्याने हल्ले करणाऱ्या बिबट्याचा आता वावर बारामती शहराच्या जवळपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असलेल्या मळद परिसरात बिबट्या फिरत असल्याचे नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
निरावागज, मळद, आसपासच्या भागात मागील काही दिवसांपासून बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. अनेक ठिकाणी पाळीव प्राण्यांचा मृतदेह मिळत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागापुरता मर्यादित असलेला हा धोका आता शहराच्या उंबरठ्यापर्यंत आल्याने नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.
नागरिकांनी पुन्हा पुन्हा कळवूनही अद्याप वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रभावी कारवाई केली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त होत असून लोकांनी सुरक्षेच्या दृष्टीने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.





