ज्येष्ठ नागरिकांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या आरोपीस 2 वर्षांनंतर अखेर बारामती पोलिसांच्या शिताफीने बेड्या
बारामती शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

ज्येष्ठ नागरिकांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या आरोपीस 2 वर्षांनंतर अखेर बारामती पोलिसांच्या शिताफीने बेड्या
बारामती शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील ज्येष्ठ नागरिकांना पर्यटनाचे आमिष दाखवून त्यांच्या कष्टाची बचत लाटणाऱ्या फरार आरोपीस दोन वर्षांच्या सततच्या पोलिस शोधमोहीमेनंतर अखेर बारामती शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.
सन 2023 मध्ये ज्येष्ठ नागरिकांना “सिक्कीम – दार्जिलिंग पर्यटन टूर आयोजित करुन देतो” असे आमिष दाखवत, वेळोवेळी 2,10,000/- रुपये घेऊन त्यांचा अपहार करणाऱ्या इसमाविरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन येथे 2023 मध्ये भा.दं.सं. 420, 406 अन्वये दिनांक 27/06/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यातील आरोपी तो इसम आदम मेहबूब सय्यद रा. पवारवाडी, ता. फलटण, जि. सातारा हा गुन्हा दाखल झाल्यापासून सतत ठिकाणे बदलत होता, पोलिसांना दिशाभूल करत पळ काढत होता आणि दोन वर्षे फरार होता. बारामती शहर पोलिसांच्या पथकातील पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे पोलीस हवालदार सुलतान डांगे, पोलीस शिपाई पोपट कवीतके, पोलीस शिपाई गिरीष नेवसे यांनी अथक परिश्रम करून, तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती, आणि सततच्या पाठपुराव्याद्वारे आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेतला.
दिनांक 01/12/2025 रोजी आरोपी आपल्या राहत्या घरी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकाने शिताफीने सापळा रचला. पवारवाडी येथील राहत्या घराजवळून आरोपीस जेरबंद करण्यात आले.
सध्या हा गुन्हा महिला पोलीस उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपासला जात असून, आरोपीने इतर व्यक्तींचीही अशा प्रकारे फसवणूक केली आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी मान्यवर अधिकारी मा. संदीपसिंग गिल साहेब – पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण,मा. रमेश चोपडे साहेब – अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे, मा. गणेश बिरादार साहेब – अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती, मा. सुदर्शन राठोड साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती, मा. श्रीशैल चिवडशेट्टी, पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे आवाहन पर्यटन, गुंतवणूक, लॉटरी किंवा अन्य कोणतेही आर्थिक आमिष दाखवून फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री चिवडशेट्टी यांच्या तर्फे करण्यात आली आहे.






