स्थानिक

बारामती नगरपालिका निवडणूक : मुंबई हायकोर्टाकडून याचिकेस मनाई,मतदान 20 डिसेंबरला होणार

60 दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने नगरपालिका व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बारामती नगरपालिका निवडणूक : मुंबई हायकोर्टाकडून याचिकेस मनाई,मतदान 20 डिसेंबरला होणार

60 दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने नगरपालिका व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बारामती वार्तापत्र

बारामती नगरपालिका निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार होते. मात्र निवडणूक प्रक्रियेवर काही आक्षेप नोंदवत दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.

या याचिकेवर सुनावणी पूर्ण करून मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने याचिका फेटाळत निवडणुकीचे मतदान आता २० डिसेंबरला घेण्याचे आदेश कायम ठेवले आहेत. आज 5 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत हा निर्णय कोर्टाने घेतला.

सिद्धी सतीश अकाले यांनी ही याचिका दाखल केली होती. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून नूतनीकरणासह पुन्हा निवडणूक घेण्याची त्यांची मागणी होती. त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी अॅड. सुशांत प्रभुणे यांनी न्यायालयात बाजू सादर केली. यावर नगरपालिका आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने अॅड. अभिजीत कुलकर्णी यांनी विरोध केला.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यास नकार देत २० डिसेंबर रोजीच मतदान होणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र याबाबत ६० दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने नगरपालिका व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

उमेदवारांचे भवितव्य कोर्टाच्या निर्णयावर..?
बारामतीतील सतीश फाळके, अलीअजगर बारामतीवाला, अविनाश गायकवाड यांनी नगरपरिषदेच्या आवारात गर्दी असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करता आला नसल्याचे सांगत जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या तिघांनाही दि. २५ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली होती. या विरोधात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

यावर पुढील सुनावणीसाठी न्यायालयाने कालावधी दिलेला आहे.

त्यामुळं याबाबत काय निर्णय होतो त्यावर संबंधित प्रभागातील निवडून येणाऱ्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असणार आहे, अशी माहिती माहिती बारामती नगर परिषद व निवडणूक निर्णय अधिकारी यांची बाजू मांडणारे ॲड. अभिजीत कुलकर्णी यांनी दिली.

Back to top button