बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर भाजपचे आंदोलन!; राजकीय वातावरण तापले
घोषणाबाजीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर भाजपचे आंदोलन!; राजकीय वातावरण तापले
घोषणाबाजीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. बारामतीतील सहयोग संस्कृती परिसरात हे आंदोलन पार पडले. विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती व ‘सारथी’ संस्थेच्या थकीत निधीच्या प्रश्नावरून भाजप कार्यकर्त्यांनी हे आंदोलन छेडले.
आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी “विद्यार्थ्यांचे पैसे द्या”, “सारथीचे पैसे द्या”, “वंदे मातरम” अशा जोरदार घोषणा दिल्या. तसेच “अजितदादा जवाब द्या” अशा घोषणा देत उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर टीका करण्यात आली. घोषणाबाजीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही वेळाने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या आंदोलनामुळे परिसरातील नागरिकांमध्येही चर्चा सुरू झाली होती.
विशेष म्हणजे, बारामती नगर परिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हे आंदोलन आयोजित करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी यांच्यातील युतीबाबत पुन्हा एकदा शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत.
या आंदोलनामुळे बारामतीतील राजकीय वातावरण तापले असून, येणाऱ्या काळात स्थानिक राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






