राजकीय

अजितदादांच्या बारामतीतील घरासमोर आंदोलन; राष्ट्रवादीने दखल घेतली, मात्र पत्रकारांवरच झाला आरोप..

कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष

अजितदादांच्या बारामतीतील घरासमोर आंदोलन; राष्ट्रवादीने दखल घेतली, मात्र पत्रकारांवरच झाला आरोप..

कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर भाजप कार्यकर्त्यांनी ‘सारथी’ संस्थेला निधी द्यावा, या मागणीसाठी आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तातडीने पत्रकार परिषद घेण्यात आली.

ही पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल,युवक अध्यक्ष ज्ञानेश्वर पोमणे,पक्षाचे प्रवक्ते अजित मासाळ यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे आंदोलन हे केवळ प्रसिद्धीसाठी व भाडोत्री लोकांना आणून आठ ते दहा जणांनी हे आंदोलन केल्याचा आरोप केला. तसेच ‘सारथी’ संस्थेसाठी यापूर्वी दिलेल्या निधीची सविस्तर आकडेवारीही त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

मात्र या पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांचा पारा चढला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अजित मासाळ यांनी पत्रकारांबाबत “सुपारीबाज पत्रकार” असा शब्दप्रयोग केल्याने वाद निर्माण झाला. त्यांच्या या वक्तव्यामुळे बारामती शहरातील पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी पसरली.

या वक्तव्याचा निषेध म्हणून बारामतीतील पत्रकारांनी निषेध नोंदवला. पत्रकारांवर अशा प्रकारचे आरोप करणे हे लोकशाही आणि पत्रकार स्वातंत्र्याला बाधा आणणारे असल्याची भावना पत्रकारांनी व्यक्त केली.

दरम्यान,या संपूर्ण प्रकरणाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने गंभीर दखल घ्यावी आणि संबंधित पदाधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी,अशी मागणी बारामतीतील पत्रकारांच्या वतीने करण्यात येत आहे.या वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button