बारामतीतील स्पीड ब्रेकर ठरत आहेत जीवघेणे भिगवण रोडवर भीषण अपघात; कार उलटली, सुदैवाने जीवितहानी टळली
हायलाइटर, पांढऱ्या पट्ट्या किंवा सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत

बारामतीतील स्पीड ब्रेकर ठरत आहेत जीवघेणे भिगवण रोडवर भीषण अपघात; कार उलटली, सुदैवाने जीवितहानी टळली
हायलाइटर, पांढऱ्या पट्ट्या किंवा सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत
बारामती वार्तापत्र
बारामती–भिगवण रस्त्यावर असलेल्या रेल्वे स्टेशनसमोरील स्पीड ब्रेकरमुळे दिनांक १२\१२\२०२५ रोजी रात्री भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. काल रात्री सुमारे अकराच्या सुमारास एक चारचाकी वाहन या स्पीड ब्रेकरवरून जात असताना अचानक नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली. अपघाताची तीव्रता मोठी असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघाताच्या वेळी गाडीतील एअरबॅग तात्काळ उघडल्याने वाहनातील व्यक्तीचा जीव वाचला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. पलटी झालेली गाडी सरळ करून वाहनातील व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जखमी व्यक्तीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित स्पीड ब्रेकरवर कोणतेही हायलाइटर, पांढऱ्या पट्ट्या किंवा सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. रात्रीच्या वेळी हा स्पीड ब्रेकर स्पष्टपणे दिसत नसल्यामुळेच हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे बारामतीतील अनेक स्पीड ब्रेकर हे अपघातांना निमंत्रण देत असून ते ‘जीवघेणे’ ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन धोकादायक स्पीड ब्रेकरवर योग्य रंगकाम, रिफ्लेक्टर, सूचना फलक आणि लाईट्स बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.






