CPR जीवनरक्षक प्रणाली कार्यशाळेस बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बारामतीत दीडशेहून अधिक नागरिकांचा सक्रिय सहभाग

CPR जीवनरक्षक प्रणाली कार्यशाळेस बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बारामतीत दीडशेहून अधिक नागरिकांचा सक्रिय सहभाग
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात रविवारी CPR (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) प्रात्यक्षिक व प्रत्यक्ष सराव कार्यशाळेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या विमलधाम येथे आयोजित या कार्यशाळेत सुमारे १५० हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमाचे आयोजन श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ, बारामती यांच्या वतीने करण्यात आले होते, तर बारामती शहर भूलतज्ज्ञ संघटनेचे या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यशाळेच्या सुरुवातीस मार्गदर्शन करताना डॉ. दिनेश ओसवाल यांनी “CPR ही मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीसाठी जगण्याची शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची संधी आहे” असे प्रतिपादन केले. त्यानंतर हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहूल ओसवाल यांनी CPR कोणाला द्यावे, कोणत्या परिस्थितीत द्यावे, तसेच CPR मुळे रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाचा जीव कसा वाचू शकतो, हे प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले.
सार्वजनिक ठिकाणी एखादी व्यक्ती अचानक कोसळल्यास, शुद्ध हरपल्यास, श्वास व नाडी थांबल्यास केवळ बघ्याची भूमिका न घेता आत्मविश्वासाने पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन भूलतज्ज्ञ डॉ. नीती महाडिक व डॉ. शुभांगी शहा यांनी केले. “जीवन वाचवण्यापेक्षा श्रेष्ठ कार्य आयुष्यात दुसरे नाही” असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
हृदयगती थांबल्यानंतर पहिल्या सहा मिनिटांत उपचार न मिळाल्यास मृत्यू अटळ असतो आणि म्हणूनच प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याचे सांगत डॉ. संतोष घालमे, डॉ. दादासाहेब वायसे, डॉ. निकिता मेहता आणि डॉ. सुनयना नरूटे यांनी बेशुद्ध व्यक्तीच्या छातीवर योग्य पद्धतीने दाब देऊन मेंदूला रक्तपुरवठा कसा सुरू ठेवता येतो, याचे सविस्तर प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉक्टरांनी समर्पक उत्तरे दिली.
कार्यशाळेच्या पुढील टप्प्यात डॉ. सौरभ मुथा, डॉ. सिसोदिया, डॉ. विशाल मेहता, डॉ. राकेश मेहता, डॉ. शशांक शाह व डॉ. सुजित अडसूळ यांनी सर्व उपस्थितांकडून प्रत्यक्ष CPR देण्याचा सराव करून घेतला. त्यामुळे नागरिकांचा आत्मविश्वास वाढला असून, आपत्कालीन परिस्थितीत CPR देण्यासाठी ते सक्षम झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री जैन संघाचे अध्यक्ष श्री. मनोज मुथा व सेक्रेटरी श्री. प्रताप दोशी यांनी सर्व भूलतज्ज्ञ डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल गौरव केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री दिलीप दोशी, महेंद्र ओसवाल, प्रबोध शहा, संतोष मेहता, महेश ओसवाल, प्रफुल्ल मुथा, अमित शहा, आनंद टाटीया, प्रशांत शहा, दीपक मुथा तसेच डॉ. खुशी ओसवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.






