बारामती नगरपरिषद निवडणूक रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
निवडणूक प्रक्रियेला हिरवा कंदील दिला आहे.

बारामती नगरपरिषद निवडणूक रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
निवडणूक प्रक्रियेला हिरवा कंदील दिला आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषद निवडणूक रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ही याचिका सिद्धी प्रतिक अक्कर यांनी दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही याचिका ऐकून घेतल्यानंतर ती नामंजूर केली.
याचिकाकर्त्याने संपूर्ण बारामती नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने तीव्र शब्दांत निरीक्षण नोंदवत सांगितले की, अशा स्वरूपाची याचिका ही न्यायालयीन प्रक्रियेचा आणि कायद्याचा गैरवापर आहे. याचिकाकर्त्याने स्वतःचे नामनिर्देशन दाखल केलेले नाही तसेच यापूर्वी दाखल केलेले अपीलही मागे घेतले असताना, अशा परिस्थितीत निवडणूक रद्द करण्याची याचिका दाखल करण्याचा अधिकार कसा काय मिळतो, असा सवाल खंडपीठाने उपस्थित केला.
या प्रकरणात बारामती नगरपरिषदेच्या वतीने वकील अभिजीत कुलकर्णी आणि वकील सम्राट शिंदे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांनी निवडणूक प्रक्रिया कायदेशीर असून त्यामध्ये कोणतीही गंभीर त्रुटी नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
सर्व बाबींचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळत निवडणूक प्रक्रियेला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे बारामती नगरपरिषदेची निवडणूक ठरल्याप्रमाणे २० डिसेंबर रोजीच होणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेवरील संभ्रम दूर झाला असून प्रशासन आणि मतदारांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.





