अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत बारामतीत प्रभाग १७,१८,१९ भव्य प्रचारफेरी
परिसरात उत्साहाचे वातावरण

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत बारामतीत प्रभाग १७,१८,१९ भव्य प्रचारफेरी
परिसरात उत्साहाचे वातावरण
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेची आगामी निवडणूक सध्या निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज बारामती शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन करत भव्य प्रचारफेरीचे आयोजन केले.
राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांच्यासह विविध प्रभागांतील उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने समर्थक या प्रचारफेरीत सहभागी झाले होते.
या प्रचारफेरीदरम्यान शहरातील विविध भागांत नागरिकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. ठिकठिकाणी फुलांची उधळण, घोषणाबाजी आणि राष्ट्रवादीच्या विजयाच्या घोषणा देत नागरिकांनी आपला पाठिंबा व्यक्त केला. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
बारामती नगरपरिषद निवडणुकीसाठी दि. २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची रणनीती अधिक प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव हे मतदारांच्या थेट संपर्कावर भर देत असून, वैयक्तिक भेटीगाठी, संवाद आणि प्रचारफेरीच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत.
आज शहरातील प्रभाग क्रमांक १७,१८,१९ मधील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव व सुनील सस्ते तसेच इतर उमेदवार राष्ट्रवादीच्या वतीने जोरदार प्रचारफेरी काढण्यात आली. या फेरीदरम्यान बोलताना सचिन सातव यांनी सांगितले की, “बारामतीचा सर्वांगीण कायापालट करण्याची धमक अजितदादांमध्ये आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बारामतीने नेहमीच विकासाची नवी दिशा घेतली आहे. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना निवडून देऊन अजितदादांचे हात अधिक बळकट करावेत.”
राज्यात नेहमीच बारामतीच्या विकासाची उदाहरणे दिली जातात, असे नमूद करत सातव यांनी विश्वास व्यक्त केला की, याचप्रमाणे या नगरपरिषद निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या विजयाचीच चर्चा होईल. “बारामतीकरांची सेवा हाच आमचा मुख्य उद्देश आहे. विकास, सुविधा आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे विकासाच्या या वाटचालीत बारामतीकरांनी राष्ट्रवादीला भक्कम साथ द्यावी,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
एकूणच, आजच्या प्रचारफेरीमुळे बारामतीतील राजकीय वातावरण अधिक तापले असून, आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.






