राजकीय

बारामतीत जुने सहकारी पुन्हा एकत्र; प्रचाराच्या निमित्ताने राजकीय समीकरणांना कलाटणी

सुनील सस्ते हे प्रभाग क्र. १९ मधून निवडणूक लढवत आहेत.

बारामतीत जुने सहकारी पुन्हा एकत्र; प्रचाराच्या निमित्ताने राजकीय समीकरणांना कलाटणी

सुनील सस्ते हे प्रभाग क्र. १९ मधून निवडणूक लढवत आहेत.

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारात एक महत्त्वाची आणि लक्षवेधी राजकीय घडामोड समोर आली आहे. माजी नगराध्यक्ष सदाबापू सातव आणि माजी विरोधी पक्षनेते सुनील सस्ते हे अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसून आले.

एकेकाळी राजकारणात खांद्याला खांदा लावून काम करणारे हे दोघे काही काळानंतर वेगवेगळ्या कारणांमुळे दुरावले होते. मात्र, निवडणुकीच्या रणधुमाळीत जुन्या सहकार्‍यांची ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे.

सदाबापू सातव नगराध्यक्ष असताना सुनील सस्ते हे सुमारे नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी नगरसेवक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर जयश्री सातव नगराध्यक्ष असतानाही सुनील सस्ते नगरसेवक म्हणून सक्रिय होते.

त्या काळात दोघांमध्ये समन्वय होता; मात्र पुढील राजकीय घडामोडींमुळे त्यांच्यात अंतर निर्माण झाले. आता सदाबापू सातव यांचे चिरंजीव सचिन सातव हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. तर सुनील सस्ते हे प्रभाग क्र. १९ मधून निवडणूक लढवत आहेत.

यावर्षी सुनील सस्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी केल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत.

त्यामुळे प्रचाराच्या निमित्ताने काल सदाबापू सातव आणि सुनील सस्ते हे पुन्हा एकत्र दिसले. नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव, प्रभाग क्रमांक १९ मधील उमेदवार प्रतिभा खरात तसेच स्वतः सुनील सस्ते यांच्यासह प्रभाग १७ मधील अलताफ सय्यद, प्रभाग क्र. १८ मधील उमेदवार राजेंद्र सोनवणे यांचा एकत्रित प्रचार करण्यात आला.

या एकत्रित प्रचारामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, शहराच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. जुने मतभेद बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र येण्याचा हा प्रयत्न मतदारांमध्ये चांगला संदेश देणारा ठरला आहे.

त्यामुळंच काल बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदाबापू आणि सुनील सस्ते यांचं एकत्र दिसणं चर्चेचा विषय ठरला आहे.

Back to top button