बारामती नगरपरिषदेत पवार काका–पुतण्याची थेट लढत; एक्झिट पोलमध्ये अजित पवार गट आघाडीवर
सुमारे ३५ नगरसेवक अजित पवार गटाचे निवडून येऊ शकतात,

बारामती नगरपरिषदेत पवार काका–पुतण्याची थेट लढत; एक्झिट पोलमध्ये अजित पवार गट आघाडीवर
सुमारे ३५ नगरसेवक अजित पवार गटाचे निवडून येऊ शकतात?
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी असलेल्या बारामती नगरपरिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. यावेळी ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या काका–पुतण्यातील राजकीय शक्तिपरीक्षेचं मैदान ठरली.
नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वेगवेगळे गट आमनेसामने उभे ठाकल्याचं चित्र पाहायला मिळालं. शरद पवार गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने स्वतंत्रपणे उमेदवार उभे करत जोरदार प्रचार केला. प्रचारादरम्यान दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप–प्रत्यारोप, विकासकामांचे दावे आणि विश्वासघाताच्या आरोपांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.
दरम्यान, मतदानानंतर आता बारामती नगरपरिषदेचा एक्झिट पोल समोर आला असून त्यानुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एकूण जागांपैकी सुमारे ३५ नगरसेवक अजित पवार गटाचे निवडून येऊ शकतात, ज्यामुळे नगरपरिषदेवर त्यांची सत्ता स्थापन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तर दुसरीकडे, शरद पवार गटासह इतर विरोधी पक्षांना मिळून केवळ ५ जागांपर्यंतच समाधान मानावं लागू शकतं, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. हे अंदाज खरे ठरल्यास, बारामतीत अजित पवार यांचं वर्चस्व अधिक मजबूत होईल आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
मात्र, एक्झिट पोल हे अंतिम निकाल नसून प्रत्यक्ष मतमोजणीनंतरच खरी परिस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष अंतिम निकालांकडे लागलं असून, बारामतीच्या जनतेने नेमकी कोणाच्या पारड्यात कौल दिला आहे, हे लवकरच समोर येणार आहे.






