बारामतीत अजित पवारांना धक्का : राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीचा फटका,अपक्ष उमेदवार वनिता सातकर,मनिषा बनकर विजयी
तब्बल ५०० पेक्षा अधिक मतांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला.

बारामतीत अजित पवारांना धक्का : राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीचा फटका,अपक्ष उमेदवार वनिता सातकर,मनिषा बनकर विजयी
५०० पेक्षा अधिक मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. प्रभाग क्रमांक पाचमधून अपक्ष उमेदवार वनिता अमोल सातकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार ऋतुजा शेरे पागळे यांचा ५०० पेक्षा अधिक मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शहराधक्षा अनिता गायकवाड यांचा अपक्ष उमेदवार मनिषा बनकर यांनी पराभव केला आहे.
प्रचारापासूनच संभ्रमाचे वातावरण
निवडणूक प्रचाराच्या काळापासूनच या प्रभागात संभ्रमाचे वातावरण होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात एकवाक्यता दिसून आली नाही. विशेष म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादीचा उमेदवार काही काळ गायब असल्याची चर्चा परिसरात रंगली होती. त्यामुळे मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता.
मतदानाच्या दिवशी नाट्य
मतदानाच्या दिवशी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार स्विय सहाय्यक स्वतः येऊन उमेदवाराला मतदान केंद्रावर आणून सोडल्याची चर्चा झाली. या घटनेमुळे या प्रभागात नेमके काय घडणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले होते.
निकालातून गटबाजी स्पष्ट
अखेर आज निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद, नाराजी आणि गटबाजीचा थेट फायदा अपक्ष उमेदवार वनिता अमोल सातकर यांना झाला. त्यांनी तब्बल ५०० पेक्षा अधिक मतांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला.
अजित पवारांसाठी इशारा?
बारामती हा अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, या निकालामुळे पक्षातील स्थानिक पातळीवरील असंतोष आणि संघटनात्मक कमकुवतपणा उघड झाला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी गंभीर इशारा मानला जात आहे.
राजकीय चर्चांना उधाण
या पराभवानंतर बारामतीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. “अपक्ष उमेदवाराचा विजय हा जनतेचा कौल की पक्षांतर्गत बंडाचा परिणाम?” असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.






