अजित पवारांनी तिकिट नाकारलं, बारामतीत अपक्ष लढले निलेश इंगुले, जिंकून येताच दंड थोपटत साजरा केला विजय
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अजित पवारांनी तिकिट नाकारलं, बारामतीत अपक्ष लढले निलेश इंगुले, जिंकून येताच दंड थोपटत साजरा केला विजय
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
बारामती वार्तापत्र
राज्यभरातील नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकांचे निकाल रविवारी लागले आहेत. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाजी मारली आहे. दरम्यान याच ठिकाणी अजित पवारांवर नाराज झालेले एक कार्यकर्ते निलेश इंगुले यांनी तिकिट न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवली होती.
ते ही निवडणूक जिंकून आले आहेत. त्यानंतर त्यांनी जल्लोष साजरा केला आणि दंड थोपटत अजित पवारांनाच ताकद दाखवली. निलेश इंगुलेंचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निलेश इंगुले यांनी मतदान केंद्राबाहेरच दंड थोपटून आनंद साजरा केला आहे.
विजयानंतर निलेश इंगुले काय म्हणाले?
“हर हर महादेव, अख्ख्या बारामतीने मला २४१ मतांनी निवडून दिलं आहे.बॅलेटचं व्होटही मला मिळालं आहे. पाच बूथवर मी लीडला होतो. २३०४ मतं मला मिळाली आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांना २०६३ मतं मिळाली. मी २४१ मतांनी मी निवडून आलोय. धनशक्ती, एका नावाची ताकद, बारामतीतली दादागिरी मोडून मला लोकांनी मतदान केलं. मला सगळ्या लोकांनी साथ दिली. मी अजित पवारांचा कार्यकर्ता आहे. जनता जे सांगेल ती मी करेन. माझ्याबाबत कुणीतरी सारखं अजित दादांच्या कानात सांगायचं. २००१ ला अजितदादांमुळे निवडून आलो. त्यानंतर मला तिकिट मिळालं नाही, मी दोनवेळा अपक्ष लढलो आणि निवडून आलो. आत्ताही मलाच तिकिट मिळेल असं वाटलं होतं पण मिळालं नाही. पण जनता माझ्या बरोबर आहे. मी सगळ्या मतदारांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो.” असं निलेश इंगुलेंनी म्हटलं आहे.
अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे किती नगराध्यक्ष?
पुणे जिल्ह्यात १४ नगरपरिषदा आणि आणि ३ नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यापैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागांवर यश मिळवलं आहे. बारामती, लोणावळा, दौंड, तळेगाव दाभाडे, शिरुर, जेजुरी, भोर, इंदापूर, वडगाव, फुरसुंगी, माळेगाव अशा दहा ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्ष बसणार आहेत. असं असलं तरीही निलेश इंगुले यांची चर्चा रंगली.
कारण निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना एकाने खांद्यावर उचलून घेतलं. ज्यानंतर त्यांनी दंड थोपटत आपली ताकद दाखवून दिली. सोशल मीडियावर निलेश इंगुलेंचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. अजित पवारांनी तिकिट नाकारलं होतं त्यामुळे निलेश इंगुले राष्ट्रवादीच्या विरोधात निवडूक लढवली आणि निवडून आले. आता निलेश इंगुले पुन्हा राष्ट्रवादीत जाणार का? हा प्रश्न अद्याप कायम आहे.






