दिया छाजेड व इशिका अडसूळ यांच्या जागतिक विक्रमाबद्दल शरद पवार यांच्याकडून कौतुकाची थाप
नगरच्या रोबोटिक्स चॅम्पियनशिपवर भारताचा झेंडा अभिमानाने फडकला

दिया छाजेड व इशिका अडसूळ यांच्या जागतिक विक्रमाबद्दल शरद पवार यांच्याकडून कौतुकाची थाप
नगरच्या रोबोटिक्स चॅम्पियनशिपवर भारताचा झेंडा अभिमानाने फडकला
बारामती वार्तापत्र
उत्तर युरोपातील एस्टोनिया येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत अहिल्यानगरच्या दिया प्रीतम छाजेड व इशिका अभिजीत अडसूळ या दोन भारतीय विद्यार्थिनींनी ऐतिहासिक कामगिरी करत जगात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जगातील ७० प्रगत देशांतील २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मागे टाकत त्यांनी हे दैदीप्यमान यश संपादन केले असून भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिमानाने उंचावला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिया छाजेड व इशिका अडसूळ यांचे मनापासून कौतुक केले. या दोन्ही विद्यार्थिनींनी मिळवलेले यश केवळ वैयक्तिक नसून ते संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असल्याचे मत श्री. पवार यांनी व्यक्त केले.
विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात भारतीय विद्यार्थीनी आघाडीवर असल्याचे हे उत्तम उदाहरण असून, अशा यशामुळे देशातील तरुण पिढीला नवी प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
एस्टोनिया येथे पार पडलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध टप्प्यांमधून जावे लागले. रोबोट डिझाइन, प्रोग्रामिंग, अचूकता, वेळेचे व्यवस्थापन आणि समस्या सोडवण्याची क्षमता या सर्व बाबींमध्ये दिया व इशिका यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
प्रत्येक फेरी यशस्वीरीत्या पार करत अखेरीस त्यांनी प्रथम क्रमांक मिळवून जगात ‘नंबर वन’ होण्याचा मान मिळवला.
शरद पवार यांनी केलेल्या कौतुकामुळे आम्ही अत्यंत भारावून गेलो असून, त्यांच्या शब्दांनी आम्हाला भविष्यात आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली असल्याची भावना दिया छाजेड व इशिका अडसूळ यांनी व्यक्त केली.
आमच्या यशामागे पालक, शिक्षक आणि मार्गदर्शकांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या यशामुळे अहिल्यानगरचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल झाले असून, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी प्रेरणादायी घटना ठरली आहे.






