सानिया कान्हारकरची राज्यस्तरीय निवड – रामकृष्ण वाघ महाविद्यालयासाठी अभिमानास्पद यश
पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा

सानिया कान्हारकरची राज्यस्तरीय निवड – रामकृष्ण वाघ महाविद्यालयासाठी अभिमानास्पद यश
पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘करिअर कट्टा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत राज्यभरातील विविध महाविद्यालयांमध्ये करिअर संसद स्थापन करण्यात आली आहे.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, करिअरविषयक जाणीव, संघटन कौशल्ये तसेच सामाजिक बांधिलकी विकसित करणे हा आहे.
गेल्या एक वर्षाच्या कालावधीत करिअर संसदेला देण्यात आलेली सर्व जबाबदारी, उपक्रम, नियोजित कामे वेळेत, सातत्याने व प्रभावीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून राज्यपातळीवरील पाच उत्कृष्ट पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
या मानाच्या निवडीत रामकृष्ण वाघ महाविद्यालयातील विद्यार्थिनी सानिया राजू कान्हारकर हिची निवड झाल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सानिया हिने करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत विविध शैक्षणिक, मार्गदर्शनात्मक व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी बजावली.
तिच्या नेतृत्वगुणांमुळे व जबाबदारीच्या भूमिकेतून केलेल्या कार्यामुळे तिची राज्यस्तरीय निवड करण्यात आली आहे.
या यशाबद्दल बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशनात सानिया कान्हारकर हिला २५,००० रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. मारोती वाघ, संचालिका लता वाघ, करिअर कट्टा समन्वयक प्रा. सायली लाखे पिदळी व प्रा. किरण पांडे यांनी सानिया हिचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच रामकृष्ण वाघ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंदांनी तिचे भरभरून कौतुक केले.
या निवडीबद्दल संस्थेचे संचालक डॉ. मारोती वाघ, संचालिका लता वाघ, कार्यकारी प्राचार्य पंकज झगडे, सर्व विभागांचे समन्वयक प्रा. दीपक ठाकरे, करिअर कट्टा समन्वयक प्रा. सायली लाखे पिदळी व प्रा. किरण पांडे यांनी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे तसेच निवड समितीचे मनापासून आभार मानले.
सानिया कान्हारकरच्या या यशामुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली असून भविष्यात आणखी विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.






