माजी नगराध्यक्ष सुनील पोटे व नवनिर्वाचित नगरसेवक यशपाल पोटे यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी भेट
दंड थोपटल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल

माजी नगराध्यक्ष सुनील पोटे व नवनिर्वाचित नगरसेवक यशपाल पोटे यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी भेट
दंड थोपटल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ मधील निवडणूक पहिल्या दिवसापासूनच मोठ्या चर्चेचा विषय ठरली होती. उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रचार, आरोप–प्रत्यारोप, राजकीय समीकरणे आणि स्थानिक पातळीवरील घडामोडींमुळे ही निवडणूक शेवटच्या दिवसापर्यंत चर्चेत राहिली.
निकाल जाहीर झाल्यानंतरही या निवडणुकीची चर्चा थांबलेली नाही.या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष सुनील पोटे यांचे चिरंजीव यशपाल सुनील पोटे यांनी प्रभाग क्रमांक १५ मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जितेंद्र बबन गुजर यांचा तब्बल ९०९ मतांनी पराभव केला. हा विजय बारामतीच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, संपूर्ण शहरात तो चर्चेचा विषय ठरला आहे.
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर माजी नगराध्यक्ष सुनील पोटे पुन्हा एकदा चर्चेत आले. निकालानंतर बारामतीतील नटराज नाट्य कला मंदिरासमोर त्यांनी दंड थोपटल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटल्या आणि पोटे कुटुंब पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले.
या विजयाला विशेष महत्त्व यासाठीही प्राप्त झाले आहे की पराभूत उमेदवार जितेंद्र बबन गुजर हे विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त व माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किरण बबन गुजर यांचे धाकटे बंधू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासाठी हा पराभव अनपेक्षित मानला जात आहे.
दरम्यान, आज माजी नगराध्यक्ष सुनील पोटे व नवनिर्वाचित नगरसेवक यशपाल पोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व देशातील ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या विजयाकडे पाहण्याचा वेगळा राजकीय दृष्टिकोन या भेटीतून समोर येत असल्याचे बोलले जात आहे.






