स्थानिक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विकासकामांची पाहणी

सेंट्रल पार्कची कामे गतीने पूर्ण करा-उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विकासकामांची पाहणी

सेंट्रल पार्कची कामे गतीने पूर्ण करा-उपमुख्यमंत्री

बारामती वार्तापत्र

प्रशासकीय इमारतीच्या बाजूला नव्याने उभारण्यात येणारे सेंट्रल पार्क ही शहराच्या वैभवात भर पाडणारी वास्तू असून त्याची कामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि गतीने पूर्ण करावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

श्री. पवार यांनी इंदापूर रस्ता व बसस्थानक परिसर सुशोभिकरण, सेंट्रल पार्क समोरील रिंगरोड सुशोभिकरण, महापुरुषांच्या पुतळ्याचे काम, जलतरण तलाव, गौतम बाग ते फडतरे वस्ती चौपदरी रस्त्याच्या कामाची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

श्री. पवार म्हणाले, सेंट्रल पार्क बाहेरील रिंगरोडचे सुशोभीकरणाची कामे गतीने पूर्ण करावीत. प्रशासकीय इमारत आणि सेंट्रल पार्क दरम्यानच्या संरक्षक भिंतीची उंची वाढवावी.पदपथाच्या आतील बाजूस पाणी साचणार नाही, यादृष्टीने कामे करावीत.

सेंट्रल पार्कच्या समोरील जागेवर महापुरुषांचे पुतळे बसविण्याचे काम करण्यात येत असून पुतळ्यांच्या मागील बाजूस आकर्षक भिंतीचे काम करावे. पुतळ्याला हार घालतांना अडचण येणार नाही, यादृष्टीने त्याची उंची घ्यावी.

बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही, याकरिता रिक्षा, चारचाकी, दुचाकी यांच्याकरिता पर्यायी जागेचा विचार करावा. इंदापूर रस्त्यावरील जड, अवजड वाहनांच्या रहदारी विचारात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. इंदापूर रस्त्याचे सुशोभीकरण करावे. गौतम बाग ते फडतरे वस्ती चारपदरी रस्त्याचे कामे गतीने पूर्ण करावी.

कालवा परिसरात उभारण्यात येणाऱ्या जलतरण तलावाच्या कामामध्ये उत्कृष्ट गुणवत्तेचे साहित्य वापरावे. कालवा परिसरात स्वच्छता राहील तसेच गाळ्याच्या दर्शनी भागात नावाचे फलक एकसारखे दिसेल, याबाबत दक्षता घ्यावी. शहरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे. परिसरातील प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

यावेळी नगर पालिकेचे नगराध्यक्ष सचिन सातव, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार स्वप्नील रावडे, गट विकास अधिकारी किशोर माने, मुख्याधिकारी पंकज भुसे, उपअभियंता सुभाष पाटील आदी उपस्थित होते.

Back to top button