स्थानिक

बेकायदेशीर होल्डिंग उभारणीस बारामती नगरपरिषदेचे मौन की सहकार्य?

नदीपात्रात रातोरात सुरू असलेले काम अपघातास आमंत्रण ठरण्याची शक्यता

बेकायदेशीर होल्डिंग उभारणीस बारामती नगरपरिषदेचे मौन की सहकार्य?

नदीपात्रात रातोरात सुरू असलेले काम अपघातास आमंत्रण ठरण्याची शक्यता

बारामती वार्तापत्र 

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बारामतीचे नेतृत्व करणारे अजित पवार हे इंदूर शहराच्या धर्तीवर बारामती शहर स्वच्छ, सुंदर व नियोजनबद्ध करण्यासाठी सातत्याने पाहणी दौरे करत आहेत. शहरातील अतिक्रमण, अस्वच्छता व बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी वेळोवेळी दिले आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित काही नगरसेवकांचे शुभचिंतक बेकायदेशीर मार्गाने व्यवसाय करण्यासाठी थेट नदीपात्रात मोठमोठे होल्डिंग उभारत असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे.
विशेष म्हणजे हे सर्व काम बारामतीकर झोपेत असताना, रात्रीच्या अंधारात सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. नदीपात्रात कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून होल्डिंग उभारणे हे केवळ बेकायदेशीरच नव्हे तर अत्यंत धोकादायक आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास किंवा जोरदार वाऱ्यामुळे ही होल्डिंग कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशा प्रकारचे काम सुरू असताना बारामती नगरपरिषदेचे अधिकारी व संबंधित विभाग याकडे डोळेझाक का करत आहेत, हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. नगरपरिषदेच्या माहितीस शिवाय नदीपात्रात असे काम सुरू राहू शकते का? की हे सर्व काही ‘मौन की सहकार्याने’ सुरू आहे, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.
शहर स्वच्छतेचे आणि सुशोभीकरणाचे स्वप्न दाखवले जात असताना, दुसरीकडे बेकायदेशीर होल्डिंग उभारून शहराच्या सुरक्षिततेशी खेळ केला जात असल्याचे चित्र चिंताजनक आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल बारामतीकर विचारत आहेत.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच नदीपात्रातील सर्व बेकायदेशीर होल्डिंग तात्काळ हटवावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा ‘सुंदर बारामती’चे स्वप्न केवळ कागदावरच राहील, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Back to top button