बारामती नगर परिषदेच्या वर्धापन दिनाचा अजब कारभार,नृत्य महोत्सवामुळे शहरात चर्चेला उधाण
नगर परिषदेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

बारामती नगर परिषदेच्या वर्धापन दिनाचा अजब कारभार,नृत्य महोत्सवामुळे शहरात चर्चेला उधाण
नगर परिषदेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
बारामती वार्तापत्र
बारामती नगर परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त यंदा आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम सध्या संपूर्ण बारामतीत चर्चेचा विषय ठरत आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा याच दिवशी कार्यभार घेतला आणि नगर परिषदेचा वर्धापन दिन एकाच दिवशी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नृत्य महोत्सवामुळे मोठा वाद निर्माण झाला असून, नगर परिषदेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
आजवरच्या बारामती नगर परिषदेच्या इतिहासात वर्धापन दिनानिमित्त अशा स्वरूपाचा मनोरंजनात्मक कार्यक्रम कधीही आयोजित करण्यात आला नव्हता. वर्धापन दिन म्हणजे नगर परिषदेच्या स्थापनेचा गौरव, आतापर्यंतची कामगिरी, विकासाचा आढावा आणि भविष्यातील दिशा यावर चर्चा करण्याचा दिवस मानला जातो. मात्र यंदा या दिवसाला नृत्य महोत्सवाचे स्वरूप दिल्याने अनेक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
या कार्यक्रमामुळे नगर परिषदेच्या प्रतिष्ठेला गालबोट लागल्याची भावना अनेक नागरिकांतून व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या पातळीवर साजरा होणारा कार्यक्रम हा सुसंस्कृत, साजरा पण मर्यादित असावा, अशी अपेक्षा असताना या प्रकारच्या कार्यक्रमामुळे बारामतीची प्रतिमा डागाळली गेल्याची चर्चा सुरू आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे विरोधी पक्षांना आयतेच कोलीत मिळाले असून, त्यांनी या विषयावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुरू केली आहे. “नगर परिषदेचा वर्धापन दिन हा जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी असतो की केवळ मनोरंजनासाठी?” असा थेट सवाल विरोधकांसह सामान्य नागरिकही उपस्थित करत आहेत.
नगर परिषदेत एकूण ४१ नगरसेवक असताना, अशा प्रकारच्या कार्यक्रमाला सर्व नगरसेवकांची संमती होती का, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.
लोकशाही पद्धतीने निवडून आलेले लोकप्रतिनिधी जर अशा वादग्रस्त निर्णयांना मान्यता देत असतील, तर ते लोकशाही मूल्यांना साजेसे आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वर्धापन दिनाचा मूळ उद्देश बाजूला सारून केवळ प्रसिद्धी आणि दिखाऊपणावर भर देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
शहरात पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतेचे प्रश्न आणि इतर मूलभूत नागरी समस्यांबाबत नागरिकांमध्ये असंतोष असतानाच अशा कार्यक्रमांवर खर्च केल्यामुळे नाराजी आणखी वाढली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर नगराध्यक्ष आणि नगर परिषदेची अधिकृत भूमिका काय असेल, कार्यक्रमासाठी किती खर्च करण्यात आला, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या कार्यक्रमांची पुनरावृत्ती होणार का, याकडे आता संपूर्ण बारामतीकरांचे लक्ष लागले आहे. प्रशासन या टीकेला कसे सामोरे जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






