राजकीय

अजित पवारांच्या ‘राक्षसी भूक’ वक्तव्यावर भाजप कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन; बारामतीत ‘बकासुराचे नैवेद्य ताट’ तयार करून निषेध

वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त

अजित पवारांच्या ‘राक्षसी भूक’ वक्तव्यावर भाजप कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन; बारामतीत ‘बकासुराचे नैवेद्य ताट’ तयार करून निषेध

वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त

बारामती वार्तापत्र 

पुण्यात केलेल्या एका भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपबाबत केलेल्या “राक्षसी भूक” या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असल्याचे चित्र दिसत आहे. या वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून, त्याचा निषेध करण्यासाठी बारामतीत आज भाजप कार्यकर्त्यांनी एक अनोख्या पद्धतीचे आंदोलन केले.

बारामती नगरपालिकेजवळ भाजप कार्यकर्त्यांनी थेट “बकासुराचे नैवेद्य ताट” तयार करत अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. या आंदोलनामध्ये प्रतीकात्मक स्वरूपात मोठ्या ताटामध्ये विविध पोस्टर्स ठेवण्यात आले होते. या पोस्टर्सवर मलिदा गॅंग, कंत्राटदारी, कमिशनखोरी, भ्रष्टाचार, घराणेशाही आणि मक्तेदारी अशा शब्दांचा उल्लेख करण्यात आला होता.

भाजप कार्यकर्त्यांनी या माध्यमातून सत्तेतील कथित गैरप्रकारांवर आणि अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका केली.
हे आंदोलन शांततेत पार पडले असून, आंदोलनानंतर सदर बकासुराचे नैवेद्य ताट कॅनलमध्ये विसर्जित करण्यात आले.

या कृतीमुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले आणि काही काळ परिसरात मोठी चर्चा रंगली.

या अनोख्या आंदोलनाची चर्चा केवळ बारामतीपुरती मर्यादित न राहता, संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, येत्या काळात यावर भाजपकडून आणखी आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, या प्रकरणावर अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत प्रतिक्रिया येण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button