बारामतीत मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा,विविध ठिकाणी केला सन्मान
पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व शुभेच्छा देऊन गौरव करण्यात आला.

बारामतीत मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा,विविध ठिकाणी केला सन्मान
पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व शुभेच्छा देऊन गौरव करण्यात आला.
बारामती वार्तापत्र
मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा मराठी पत्रकार दिन बारामती शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शहरातील विविध ठिकाणी पत्रकार बांधवांसाठी सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
बारामतीतील प्रशासकीय कार्यालय, कऱ्हावार्ता कार्यालय, विशाल जाधव मित्र परिवार,संभाजी होळकर, अविनाश बांदल यांच्या वतीने तसेच बारामती पोस्ट ऑफिस, बारामती नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव आणि बारामती शहर पोलीस स्टेशन यांच्या पुढाकाराने पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांमध्ये शहर व तालुक्यातील पत्रकारांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व शुभेच्छा देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी मान्यवरांनी पत्रकारांच्या कार्याचे कौतुक करताना समाज प्रबोधन,लोकशाही बळकट करणे, सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि सत्य व निर्भीड पत्रकारिता टिकवून ठेवण्यामध्ये पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले. बदलत्या काळात पत्रकारितेसमोर अनेक आव्हाने असली तरी पत्रकारांनी आपली सामाजिक जबाबदारी जपावी,असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या सर्व कार्यक्रमांना बारामती शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. परस्पर स्नेह, संवाद आणि सन्मानाच्या वातावरणात पत्रकार दिन साजरा झाल्याने पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
मराठी पत्रकारितेच्या उज्ज्वल परंपरेची आठवण करून देणारा हा दिवस बारामतीत उत्साह, अभिमान आणि एकोप्याने साजरा झाला.






