स्थानिक

बारामती शहरात गुणवडी रोड व विविध ठिकाणी उघड्यावर कचरा टाकण्याचा प्रकार वाढतोय

नागरिकांच्या बेफिकिरीमुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर; प्रशासन कारवाई कधी करणार?

बारामती शहरात गुणवडी रोड व विविध ठिकाणी उघड्यावर कचरा टाकण्याचा प्रकार वाढतोय

नागरिकांच्या बेफिकिरीमुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर; प्रशासन कारवाई कधी करणार?

बारामती वार्तापत्र 

बारामती हे वेगाने विकसित होत असलेले शहर असून बारामती नगरपालिका शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. घरोघरी कचरा संकलन, नियमित कचरा गाड्या, स्वच्छता कर्मचारी, जनजागृती मोहिमा राबवूनही काही नागरिक मात्र अजूनही स्वच्छतेबाबत गंभीर नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

बारामती शहरातील गुणवडी रोड परिसरातील समर्थनगर येथे काही नागरिकांकडून उघडपणे रस्त्यावर कचरा टाकला जात असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे या भागात दररोज कचरा संकलनाची गाडी येत असतानाही नागरिक कचरा गाडीत न टाकता रस्त्यावर, मोकळ्या जागेत किंवा रस्त्याच्या कडेला टाकत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे डास, माशा आणि इतर आजार पसरवणाऱ्या किड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा त्रास लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने हे चित्र अत्यंत चिंताजनक आहे.

नगरपालिकेकडून वारंवार नागरिकांना कचरा योग्य ठिकाणी टाकण्याचे आवाहन केले जात असले तरी काही नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे आता केवळ आवाहन न करता संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

समर्थनगर परिसरातील नागरिकांनी बारामती नगरपालिकेने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी.

शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाचीही आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यासच बारामती शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राहील, असे मत सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Back to top button