बारामतीत मिशन हायस्कूल मैदानात फोर व्हीलर स्टंटबाजीचा उपद्रव; नागरिक त्रस्त
अचानक ब्रेक मारणे अशा धोकादायक प्रकारचे स्टंट करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे

बारामतीत मिशन हायस्कूल मैदानात फोर व्हीलर स्टंटबाजीचा उपद्रव; नागरिक त्रस्त
अचानक ब्रेक मारणे अशा धोकादायक प्रकारचे स्टंट करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील टी. सी. कॉलेजसमोर असलेल्या मिशन हायस्कूलच्या मैदानात मागील काही दिवसांपासून फोर व्हीलर गाड्यांद्वारे बेफाम स्टंटबाजी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दर दोन दिवसांनी वेगवेगळ्या चारचाकी गाड्या या मैदानात येऊन विनाकारण वेगात गाडी चालवणे, गोल गोल फिरवणे, अचानक ब्रेक मारणे अशा धोकादायक प्रकारचे स्टंट करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रकारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून याचा त्रास परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना सहन करावा लागत आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक आणि श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींना धुळीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. मैदानालगत वस्ती असल्याने दिवसभर घराबाहेर धूळ पसरलेली दिसून येत असून घरातील खिडक्या-दारे उघडी ठेवणेही कठीण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, हा प्रकार केवळ त्रासदायकच नाही तर अपघातास आमंत्रण देणारा आहे. मैदानात अनेक वेळा लहान मुले खेळत असतात, मात्र अशा बेफाम वाहनचालकांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत संबंधित प्रशासन आणि पोलीस विभागाने तातडीने लक्ष घालून अशा स्टंटबाजीवर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
जर वेळेत उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.






