राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्ती किती शक्तिशाली ,गतिमान आणि प्रभावशाली आहे हे समजते – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे आयोजन

राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्ती किती शक्तिशाली ,गतिमान आणि प्रभावशाली आहे हे समजते – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे आयोजन
इंदापूर,आदित्य बोराटे –
शिवभक्त परिवार इंदापूर आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री तसेच संस्थेच्या अध्यक्ष हर्षवर्धन पाटील म्हणाले की राजमाता जिजाऊ यांनी राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचाच होणार ही दृढ संकल्पना घेऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहिला. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याकरिता त्यांनी पुढाकार घेतला. जिजाऊंचा इतिहास थोडा जरी वाचला तरी धैर्य निर्माण होते यातून स्त्रीशक्ती किती शक्तिशाली, गतिमान आहे हे समजते. यावेळी श्रीमंतराजे लखोजीराव जाधवराव यांचे थेट 16 वे वंशज श्रीमंतराजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव आणि इंदौरच्या होळकर घराण्याचे थेट 13 वे वंशज श्रीमंतराजे भूषणसिंह होळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये वीरपत्नी सौ. गौरी अशोक इंगवले यांना मान्यवरांच्या हस्ते यावर्षीचा जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी सर्व आजी-माजी सैनिक , एस. पी.आर .एफ ., सी. आर. पी. एफ. यांच्या माता किंवा पत्नी यांचे जिजाऊ पूजन शिवभक्त परिवार इंदापूर यांच्यावतीने करण्यात आले.विविध क्षेत्रात नवलौकिक प्राप्त केलेले विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की,’ महिलांना आणि मुलींना आवाहन आहे की आयुष्यात ज्या ज्यावेळी संघर्ष करावा लागेल संकट येतील त्या त्या वेळेला राष्ट्रमाता जिजाऊ यांची आठवण करा या सर्वांवर आपण मात कराल हा विश्वास आहे. राजमाता जिजाऊ यांनी आपल्या 76 वर्षाच्या आयुष्यामध्ये संस्कार घडविले. महिला किती प्रभावशाली नेतृत्व करू शकते हे जिजाऊंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्वामी विवेकानंद हे युवकांचे आदर्श आहेत .स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण जगामध्ये तत्त्वज्ञान, हिंदुत्व, समाज प्रबोधनाचे कार्य केले. बलशाली व स्वाभिमानी युवाशक्ती निर्माण करण्याचे कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले. अध्यात्मिक व धार्मिक संस्कारचे कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले.’
श्रीमंतराजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव म्हणाले की, ‘ प्रत्येकाला असे वाटते की आपल्या घरी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे पण त्या अगोदर प्रत्येक घरी प्रथम राजमाता जिजाऊ जन्माला आल्या पाहिजे.’
श्रीमंतराजे भूषणसिंह होळकर म्हणाले की,’ छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद तसेच आपल्या महापुरुषांनी जे कष्ट घेतले, परिश्रम केले, रक्त सांडले बलिदान दिले म्हणून स्वतंत्र भारतामध्ये आज आपण खुल्या वातावरणात लोकशाही पद्धतीने जगत आहोत म्हणून सर्वप्रथम राष्ट्र प्रथम, राष्ट्राचा विचार समोर ठेवून या महापुरुषांची जयंती आपण साजरी करून त्यांची विचारधारा आत्मसात केली पाहिजे.’
कामधेनू सेवा परिवारचे संस्थापक अध्यक्ष, समाजभूषण शिवव्याख्याते डॉ. लक्ष्मणराव आसबे म्हणाले की ,’ राजमाता जिजाऊंचा संघर्ष मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्व क्षेत्रातील कौशल्याधिष्ठित शिक्षण त्यांनी दिले. स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देऊन राजमाता जिजाऊ यांनी रयतेचे राज्य निर्माण करण्याचे कार्य केले. स्वामी विवेकानंद यांनी आपल्या कार्यातून युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण केली. डॉ. आसबे यांनी आपल्या भाषणात इतिहासातील अनेक घटनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच सद्य परिस्थितीमध्ये कोणते कार्य विद्यार्थ्यांनी हाती घेतले पाहिजे याविषयी जनजागृती केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी प्रास्ताविकामध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे कार्य सांगत महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून होत असलेल्या अनेक उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी वीरपत्नी सुवर्णाताई डोईफोडे, वीरपत्नी हेमलता बाबुराव साबळे तसेच उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे, डॉ. शिवाजी वीर, नगरसेवक अनिल पवार तसेच माजी नगरसेवक कैलास कदम, दत्तात्रेय अनपट यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फलफले सर आणि नितीन भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे आभार बापू जामदार यांनी मानले.





