बारामतीत नगरसेवकांचा सत्कार सोहळा;नगराध्यक्षांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण
नगराध्यक्षांच्या या भाषणातील वक्तव्य यामुळे उपस्थितांमध्येही कुजबुज सुरू होती.

बारामतीत नगरसेवकांचा सत्कार सोहळा;नगराध्यक्षांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण
नगराध्यक्षांच्या या भाषणातील वक्तव्य यामुळे उपस्थितांमध्येही कुजबुज सुरू होती.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील स्पोर्ट्स फाउंडेशनच्या हॉटेल सिटी इन येथे नगरसेवकांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शहरातील अनेक विद्यमान व माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. सत्कार समारंभादरम्यान नगराध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यामुळे मात्र शहराच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.
कार्यक्रमात भाषण करताना नगराध्यक्षांनी आपल्या शैलीत विरोधकांवर अप्रत्यक्षपणे टीका केली.मी नव्वद टक्के गोड बोलतो. आणि ज्यावेळेस मी दहा टक्के वेगळं बोलतो त्यावेळेस समोरच्याला घाम फुटल्याशिवाय राहत नाही. हे विधान विरोधकांना उद्देशून केलेला राजकीय इशारा किंवा दबाव तर नाही ना, अशी चर्चा सध्या बारामतीत रंगली आहे.
नगराध्यक्षांच्या या भाषणातील वक्तव्य यामुळे उपस्थितांमध्येही कुजबुज सुरू होती. काहींनी हे वक्तव्य आत्मविश्वास दाखवणारे असल्याचे मत व्यक्त केले, तर काहींनी यामध्ये विरोधकांसाठी सूचक दम असल्याचा अंदाज व्यक्त केला.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नगरसेवकांचा सत्कार असला तरी नगराध्यक्षांच्या वक्तव्यामुळे हा सोहळा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. येत्या काळात या विधानावर विरोधी पक्षांकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या तरी या संपूर्ण घटनेची चर्चा बारामतीच्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू असून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






