राजकीय

राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापणार;जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतवाढीनुसार आयोगाला १५ फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापणार;जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतवाढीनुसार आयोगाला १५ फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

बारामती वार्तापत्र 

थंडीचा कडाका कमी होतोय न होतोय तोच राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे, याची चिन्हं दिसू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी लागणार?

या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज अधिकृत घोषणा केली असून, राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये  निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.

निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी आज पत्रकार परिषदेत हा Election Schedule जाहीर केला. त्यानुसार, राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर अवघ्या दोन दिवसांत, म्हणजे ७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता निकाल हाती येतील आणि ‘गावाचा कारभारी’ कोण हे समजेल. आयोगाची घोषणा होताच संबंधित जिल्ह्यांत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

कुठे होणार निवडणुका?

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी / सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांत राजकीय रणधुमाळी सुरू होणार आहे.

महत्वाच्या तारखा 

अर्ज भरण्याची मुदत: १६ जानेवारी ते २१ जानेवारी

अर्जांची छाननी: २२ जानेवारी २०२६

अर्ज माघारी: २७ जानेवारी (दुपारी ३ पर्यंत)

मतदान: ५ फेब्रुवारी (सकाळी ७.३० ते सायं. ५.३०)

निकाल: ७ फेब्रुवारी

विशेष म्हणजे, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जातील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतवाढीनुसार आयोगाला १५ फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

निवडणूक आयोग ‘ॲक्शन मोड’वर

निवडणुकीत पैशांचा पाऊस पडू नये म्हणून आयोग सज्ज झाला आहे. आतापर्यंत भरारी पथकांनी ७ कोटींची रोकड आणि ५ कोटींचं मद्य जप्त केलं आहे. या निवडणुका ईव्हीएम (EVM) द्वारेच होणार असून १ जुलै २०२५ ची मतदार यादी यासाठी वापरली जाणार आहे. प्रचारासाठी ४८ तास आधी ‘शांतता काळ’ असेल, पण घरोघरी जाऊन प्रचाराला परवानगी असेल, मात्र माईक वापरता येणार नाही.

Back to top button