बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चांना उधाण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितील मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत जिल्हाध्यक्षांचे नाव वगळल्याने खळबळ
संघटनात्मक शिस्त यावर प्रश्नचिन्ह उपस्थित

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चांना उधाण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितील मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत जिल्हाध्यक्षांचे नाव वगळल्याने खळबळ
संघटनात्मक शिस्त यावर प्रश्नचिन्ह उपस्थित
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच झालेल्या संघटनात्मक निवडीमध्ये संभाजी होळकर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या नियुक्तीनंतर अवघ्याच काही दिवसांत बारामतीत पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले आहे.
उद्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती येथील राष्ट्रवादी भवनात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली सकाळी ठीक साडेदहा वाजता कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मात्र, या निमंत्रण पत्रिकेमध्ये नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर यांचे नाव निमंत्रक म्हणून नमूद करण्यात आलेले नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. जिल्हाध्यक्षांचे नाव गाळण्यात आल्याने पक्षाच्या स्थानिक पातळीवर विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली असून, यावरून बारामतीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याची चर्चा आहे. विशेषतः जिल्हाध्यक्षपदाची अधिकृत घोषणा होऊनही अशा महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसणे, हा केवळ तांत्रिक मुद्दा आहे की जाणीवपूर्वक केलेली दुर्लक्षाची बाब आहे, याबाबत संभ्रम व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या विषयावर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, निवडणुकांच्या तोंडावर अशा प्रकारच्या घटनांमुळे पक्षातील अंतर्गत समन्वय आणि संघटनात्मक शिस्त यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे बोलले जात आहे.उद्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार या विषयावर काही भूमिका मांडतात का, तसेच जिल्हाध्यक्षांच्या नावाबाबत स्पष्टीकरण दिले जाते का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.






